Chinchwad : रोटरीच्या युथ एक्सचेंज प्रोग्रामद्वारे युवकांना सामाजिक, सांस्कृतिक आदानप्रदान करण्याची संधी

एमपीसी न्यूज – रोटरी डीस्ट्रीक्ट 3131च्या माध्यमातून ‘रोटरी युथ एक्सचेंज प्रोग्राम’ राबवला जात आहे. या उपक्रमात रोटरीच्या माध्यामातून युवक एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन राहतात आणि (Chinchwad) तिथली सामाजिक, सांस्कृतिक पद्धतींचा अभ्यास करतात. तसेच आपल्या संस्कृतीचे आदानप्रदान करतात. या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

Pimpri : शहिदांच्या सन्मानार्थ शिलाफलकांची उभारणी

रविवारी (दि. 27) सकाळी साडेआठ ते साडे अकरा या कालावधीत रोटरी कम्युनिटी सेंटर, संभाजीनगर, चिंचवड येथे हे मार्गदर्शन आणि चर्चासत्र होणार आहे. यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी कुठलीही फी नाही. ज्या युवकांना या उपक्रमाद्वारे विदेशात जायचे आहे, अशा युवक आणि त्यांच्या पालकांनी या चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन रोटरी युथ एक्सचेंज उपक्रमाचे संचालक दीपक बोधनी यांनी केले.

दीपक बोधनी यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी समन्वयक सुरेंद्र शर्मा, सह संचालिका सारिका रोडे तसेच विविध देशांमधून या उपक्रमांतर्गत भारतात आलेले युवक उपस्थित होते.

युथ एक्सचेंज प्रोग्राम हे दोन प्रकारचे आहेत. पहिला 12 आठवड्यापर्यंत आणि दुसरा 12 महिन्यांपर्यंत. रोटरीने यावर्षी या उपक्रमांतर्गत 25 युवकांना विदेशात पाठवले आहे. तर मागील वर्षी 50 विद्यार्थी विदेशात जाऊन आले आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी केल्यानंतर प्रथम उपक्रमाची संपूर्ण माहिती देण्यासाठी चर्चासत्र घेतले जाते. यामध्ये युवकांना व त्यांच्या पालकांना ज्या शंका असतील त्याचे निरसन केले जाते. त्यानंतर रोटरीकडे नोंदणी केली जाते. तिथे संबंधित युवकाची इत्थंबूत पडताळणी केली जाते. तिथे निवड झाल्यानंतर संबंधित युवकाचे ठरलेल्या कालावधीतील पालकत्व संबंधित देशातील रोटरी सदस्यांना दिले जाते.

विदेशात गेल्यानंतर हे युवक तिथली सांस्कृतिक, सामाजिक जीवनाचा अभ्यास करतात. विदेशातील युवक भारतात आल्यानंतर भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतात. एक वर्षासाठी आलेले विद्यार्थी भारतातील एखाद्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेऊन एखादा अभ्यासक्रम पूर्ण करतात. त्यासोबत नृत्य, वादन, कलाकुसर, पाककला अशा विविध बाबी शिकतात. त्यामुळे या उपक्रमात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.