Pimpri News : निसर्ग राजा मित्र जीवांचे संस्थेचा या वर्षीचा “मित्र जीवांचे पुरस्कार” लातूरच्या “शिवशंकर चापुले” यांना 

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड स्थित निसर्गराजा मित्र जीवांचे या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेचा 13 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने पर्यावरण क्षेत्रात वायक्तिक क्षमतेने काम करणाऱ्या व्यक्तीस संस्थेच्या वतीने मित्र जीवांचे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

या वर्षीचा पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील शिवशंकर दगडू चापुले यांना प्रदान करण्यात आला. 5000 रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दुर्मिळ वनस्पतींच्या बीज बँकेच्या उपक्रमासाठी त्यांना हा पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. हेमंत बेडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बांबू सोसायटी ऑफ इंडिया च्या महाराष्ट्र चाप्तर चे अध्यक्ष डॉ. हेमंत बेडेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण संशोधक डॉ. सचिन पुणेकर, केंद्रीय भूजल विभागातील संशोधक आणि सहज जलबोधकार उपेंद्रदादा धोंडे, विजय वाळके, डॉ. अभय कुलकर्णी, उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, माझ्या एकट्याच्या कामाने काय फरक पडतो हा विचार सोडून देवून काम सुरू ठेवले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. बेडेकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात केले.

पिंपरी चिंचवड तसेच महाराष्ट्रातील पर्यावरण तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक या सोहळ्यास उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि आपला राज्य वृक्ष आंबा या वृक्षाचे पूजन करून करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष  किरण घोटकुले यांनी गेल्या वर्षभरात संस्थेच्या माध्यमातून राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, त्यातील अंकुर आणि वृक्ष परिचय या उपक्रमाना राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला होता.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मारुती साळुंखे यांनी केले होते तर आभार राहुल घोलप यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या स्वयंसेवकांनी संस्थेच्या दिघी येथील रोप वाटीकेत केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.