Pune : निकालाची टक्केवारी सुधारण्याच्या जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज – दहावीचे निकाल कमी असलेल्या शाळांची कामगिरी सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून त्यामुळे कमी निकाल असलेल्या 52 शाळांचे निकाल 80 टक्क्यांपेक्षा अधिक लागल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांनी दिली.

Alandi : आळंदीत वारकऱ्यांवर सौम्य लाठी चार्ज

गेल्या वर्षी पुणे जिल्हा परिषदेने कमी निकाल असलेल्या 75 शाळा निश्चित करून त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. स्वयं-अर्थसहाय्यित खाजगी शाळा किंवा शासन अनुदानित स्वायत्त शाळा असा कोणताही विचार न करता या शाळांची कामगिरी सुधारण्यासाठी उपाययोजना आणि कृती कार्यक्रम तयार केला. या शाळांतील अध्यापन साहित्य आणि शिक्षकांची उपलब्धता या बाबींचा आढावा घेऊन असलेल्या कमतरता भरून काढण्यासाठी लक्ष दिले. त्यासाठी परिसरातील शाळांमधील शिक्षकांकडून मदत घेण्यात आली. आवश्यक तेथे प्रभावी अध्यापन पद्धतींवर मार्गदर्शन, शिक्षकांसाठी प्रशिक्षण सत्रे आयोजित केली आणि क्षमतावृद्धीसाठी उपक्रम राबविले.या सर्व शाळांना आपला सूक्ष्म आराखडा करण्यास सांगितले आणि त्यानुसार अमलबजावणीचे सनियंत्रण केले.
विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थितीच्या समस्येवर लक्ष देऊन विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित केले. शिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कनिष्ठ वर्गांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या पायाभूत संकल्पना स्पष्ट होण्यासाठी शाळांना विशेष वर्ग आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित केले.

त्यानुसार हे विविध उपाय केल्यामुळे या कमी निकाल असलेल्या 75 शाळांपैकी 52 शाळांच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली असून या शाळांचे विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण 80 टक्क्याच्या पुढे गेले आहे. याव्यतिरिक्त 15 शाळांचे उत्तीर्णतेचे प्रमाण वाढून 60 ते 80 टक्क्यापर्यंत वाढले.
उर्वरित 23 शाळांची कामगिरी सुधरण्याकडे यापुढे अधिक लक्ष देण्यात येईल. योग्य शिक्षण देण्यास अडथळे आणणाऱ्या मूलभूत समस्यांना तोंड देत असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे पर्यायी चांगल्या शाळांमध्ये सुरळीत संक्रमण करण्यासाठी आणि अशा सुमार शाळांचे परवाने रद्द करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येईल.
कॉपीमुक्त परीक्षा अभियानाला यावर्षी मोठे यश लाभले. कॉपीच्या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल केले तसेच दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन शक्य झाले आहे. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याची कामगिरी सुधारण्याच्या दृष्टिकोनातून शाळांकडून विद्यार्थ्यांवर लक्ष दिले जात आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या हेतूने कॉपीमुक्त परीक्षा अभियान यापुढेही अधिक प्रभावी पद्धतीने राबविण्यात येईल, असेही शिक्षणाधिका-यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.