Pune : विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांची निवड

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने 9 ऑगस्टला साताऱ्यात होणार संमेलन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या सहाव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन सातारा येथे ९ ऑगस्ट २०१९ रोजी होणार आहे, अशी माहिती बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली.

या एकदिवसीय साहित्य संमेलनामध्ये उदघाटन, कविसंमेलन, प्रकट मुलाखत आणि समारोपावेळी पुरस्कार वितरण असे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील आणि सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांनाही या संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

आपले लेखन, काव्यरचना सादर करण्याची संधी विद्यार्थी व शिक्षकांना या संमेलनात मिळणार आहे. त्याचबरोबर मान्यवर साहित्यिकांची मनोगतेही ऐकायला मिळणार आहेत. संपूर्ण दिवसभर शिक्षण-साहित्याचा मेळा साताऱ्यात भरणार असल्याचे प्रकाश रोकडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.