पुण्यात दोन बंदूका आणि सहा काडतुसासह सराईत गुंड जेरबंद

एमपीसी न्यूज – हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या सराईत गुंडाला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. ही कारवाई बुधवारी (15 फेब्रुवारी) दुपारी 4.20 वाजता वडगाव बुद्रुक तुकाईनगर येथे करण्यात आली.

मंगेश अरविंद खरे (वय-27, रा.तुकाईनगर, वडगाव बुद्रुक, पुणे) असे सराईत आरोपीचे नाव आहे. त्याने एक वर्षापुर्वी सराईत गुन्हेगार बंटी पवार याचा भाऊ चेतन पवार याचा पुणे ग्रामीणच्या हद्दीत खुन केला आहे. याप्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगेश खरे हा तुकाईनगर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम व त्यांच्या सहका-यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीच्या दोन बंदूका आणि सहा काडतुसे असा 51 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंड बंटी पवार टोळीकडून जिवास धोका असल्यामुळेच मंगेश खरे अवैधपणे बंदूक वापरत असल्याची माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.