चिंचवडमध्ये मतदारांना पैसे वाटताना तिघांना पकडले

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 17 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची प्रचारपत्रके हातामध्ये घेऊन मतदारांना पैसे वाटताना चिंचवड पोलिसांनी तिघांना पकडले. ही कारवाई आज (सोमवारी) दुपारी शिवनगरी, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे करण्यात आली. 

राहूल मदने, मयुर पवार (दोघे रा. साखरवाडी, ता. फलटण, जिल्हा सातारा) आणि संतोष पोफळे (रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांच्यावर कलम 171 (ई), 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी याबाबत माहिती दिली.  राहूल, मयुर आणि संतोष हे तिघे वाल्हेकरवाडी येथील शिवनगरीमध्ये मतदारांना पैसे वाटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चिंचवड पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी मोटारीचे पाहणी केली. मोटारीत प्रभाग क्रमांक 17 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार भाऊसाहेब भोईर, राजेंद्र साळुंखे, आशा सुर्यवंशी आणि शोभा वाल्हेकर यांची प्रचारपत्रके दिसली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. 

पोलिसांनी मोटार पोलीस ठाण्यात आणली. मोटारीत 15 हजार रुपयांची रोकड सापडली. त्यामध्ये 100 रुपयांच्या सगळ्या नोटा होत्या. पोलिसांनी (एमएच 14 ई यु 8109) या क्रमाकांची आय- 20 मोटार आणि 15 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत. 

  
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास राहिले आहेत. मतदारांना पैसे वाटून आमिष दाखविले जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसात पैशांचे वाटप करताना काही जणांना पकडले आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पैसे जप्त केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.