पुण्यातील आयआयएसइआरमध्ये महिला वसतीगृह उभारण्यासाठी बजाज ऑटोची मदत

नव्या इमारतीत असणार संशोधकांना सक्षम करणारे पोषक वातावरण


एमपीसी न्यूज – पुणे-स्थित इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (आयआयएसइआर)मध्ये अत्याधुनिक सोयींनी युक्त महिला वसतीगृह उभारण्यासाठी बजाज ऑटो कंपनीने 50 कोटी रुपयांची मदत दिली आहे. त्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या.  

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर की, आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, भारत एक भाग्यशाली देश आहे जिथे शिक्षण व संशोधनाच्या कामासाठी बजाज ऑटो सारख्या कंपन्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. संशोधनाच्या कार्यात दूरगामी फायदे करून देणाऱ्या बजाज ऑटोच्या या नवीन व एकमेवाद्वितीय कृतीची आम्ही प्रशंसा करतो. या प्रसंगी प्राध्यापक के एन गणेश, संचालक, आयआयएसइआर, कर्नल जी राज शेखर, नोंदणी अधिकारी, आयआयएसइआर व  सी. पी. त्रिपाठी, अध्यक्ष, जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था (जेबीजीव्हीएस) आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज म्हणाले की, विविध लोककल्याणाच्या उपक्रमांतून आर्थिक किंवा प्रत्यक्ष कृती पद्धतीने समाज ऋण फेडण्यात बजाज ऑटोचा विश्वास आहे. उच्च शिक्षणाला चालना देऊन राष्ट्र बांधणी करण्याची ही बजाज ऑटोसाठी चांगली संधी आहे.
 

एखाद्या शासकीय संशोधन संस्थेला एखाद्या कंपनीकडून दिली जाणारी ही भारतातील पहिलीच देणगी आहे. हे महिला वसतीगृह पाषाण येथील आवारात बांधले जाणार असून आधुनिक सोयींनी परिपूर्ण अशा या वसतीगृहाचा महिला संशोधकांना खूपच फायदा होणार आहे. यातून शासनाच्या बेटी बचाव-बेटी पढाव उपक्रमाला सुद्धा यातून एक प्रकारे हातभार लागणार आहे. 

आयआयएसइआरच्या एकूण विद्यार्थी संख्येत महिला विद्यार्थी व संशोधकांचे प्रमाण साधारण 40% असून स्वतंत्र महिला वसतीगृहाची नितांत आवश्यकता आहे. नव्या इमारतीमुळे महिलांना आरामदायी व सुरक्षित राहण्याची व्यवस्था मिळणार आहे. यामुळे उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या महिलांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल.

वसतीगृहाची रचना

एकूण 20,867 चौ. मीटर क्षेत्रफळ असलेल्या या 10 मजली इमारतीत साधारण 800 पर्यंत महिला राहू शकतील. आरसीसी चौकट असलेल्या या भूकंप प्रतिरोधक वसतीगृहाचे दोन भाग असतील. एका भागात प्रत्येक मजल्यावर एका व्यक्तीस राहण्या योग्य 150 चौ. फुटाच्या 28 खोल्या असतील, तर दुसऱ्या भागात प्रत्येक मजल्यावर दोघांना राहण्या योग्य 170 चौ. फुटाच्या 22 खोल्या असतील. तळ मजल्यावर अभ्यागतांच्या खोल्या, वसतीगृह अधिकाऱ्यासाठी निवासी व्यवस्था, एका व्यक्तीस राहण्या योग्य 16 खोल्या आणि दोघांना राहण्या योग्य 13 खोल्या असतील. संपूर्ण वसतीगृहात एका व्यक्तीस राहण्या योग्य 296 खोल्या तर दोघांना राहण्या योग्य 233 खोल्या असतील. सौर उर्जेवर पाणी तापवण्याची व्यवस्था इमारतीत असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.