Pune : प्रवाशांच्या मागणीवरून दौंडवरून पहाटे सुटणारी शटल पुन्हा सुरु

एमपीसी न्यूज- दौंडहुन पुण्याला जाण्यासाठी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी सुटणारी शटल काही वर्षांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आलेली होती. त्यामुळे या मार्गावरील सर्व प्रवाशांची गैरसोय होत होती. अखेरीस तीन वर्षे सतत पाठपुरावा केल्यानंतर लवकरच दौंड येथून पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी पुण्यासाठी शटल सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

दौंड येथून पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी सुटणारी शटल बंद करण्यात आल्यामुळे पहाटे कडेठान, केडगाव, खुतबाव, यवत, उरुळी कांचन, लोणी आणि मांजरी या रेल्वे स्थानकातून प्रवास करण्याऱ्या असंख्य दैनंदिन प्रवाशांना मिळेल त्या गाडीने प्रवास करावा लागत असे. त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होत होती. विशेषतः नोकरदार वर्गाला त्याचा अधिक त्रास सोसावा लागत होता.

ही गाडी पूर्ववत सुरु करण्याच्या बाबतीमध्ये एप्रिल 2015 मध्ये मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक मुंबई यांना याबाबत क्षेत्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत प्रस्ताव दिला. त्यानंतर सातत्याने तीन वर्ष पाठपुरावा करून अखेरीस दौंड येथून पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी दौंड येथून नवीन गाडी सोडण्याची मागणी रेल्वे प्रशासनाने मंजूर केली. येत्या काही दिवसातच ही नवीन गाडी या मार्गावर धावणार आहे. यासाठी मध्य रेल्वे सोलापूर आणि मध्य रेल्वे पुणे विभागाचे सर्वच अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर तसेच, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, यातायात निरीक्षक जैन यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यामुळे दौंड ते पुणे दरम्यान हक्काची आणि वेळेवर धावणारी रेल्वे मिळाली असल्याने प्रवासीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रवासी संघाचे विभागीय सल्लागार समिती सदस्य अय्युब तांबोळी, कार्याध्यक्ष गणेश शिंदे, सचिव विकास देशपांडे यांनी प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांचे मार्गदर्शनाखाली नवीन गाडीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.