24 Hours Electricity : 24 तास वीजपुरवठा करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य

एमपीसी न्यूज – सन 2025 अखेरपर्यंत भारतात मुबलक प्रमाणात (24 Hours Electricity) वीजनिर्मिती करून प्रत्येक शहर, गाव आणि दुर्गम भागाच्या कानाकोपऱ्यात 24 तास वीजपुरवठा करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. तशी डेडलाईन केंद्र सरकारने स्वतःच आखून घेतली आहे.
देशातील सर्व गावे वीजपुरवठ्याने जोडली जाणार आहेत. त्यानंतर 24 तास वीजपुरवठा हे केंद्र सरकारचे पुढचे लक्ष्य असणार आहे. राज्य सरकार आणि वीज वितरण कंपन्यांना त्याबाबत केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.
विजेची कमतरता भरून काढण्यासाठी मागील पाच वर्षात सौभाग्य आणि दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती अशा योजना केंद्र सरकारने राबविल्या आहेत. त्यामधून गाव व घरे वीजपुरवठ्याने जोडण्यात आली. असे असताना देखील देशाच्या अनेक भागांमध्ये अजूनही वीजपुरवठा पोहोचलेला नाही.
सन 2013 मध्ये देशात 240 गीगावॅट एवढी विजेची मागणी होती. मागील दहा वर्षांमध्ये विजेच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या भारताची 426 गीगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे. मागणी आणि पुरवठ्याचा मेळ साधल्यास 24 तास वीजपुरवठा करणे शक्य आहे.

हा जुमला ठरू नये
लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होणार आहे. त्यानंतर देशभर निवडणुकांचे वारे घोंगावू लागेल. दरम्यान या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने दिलेले हे मोठे आश्वासन असू शकते. तसेच हा सरकारचा निवडणुका जिंकण्यासाठी वापरलेला जुमला ठरू नये, अशी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागाचाही विचार व्हावा
शहरांमध्ये 24 तास वीजपुरवठा करणे शक्य आहे. मात्र ग्रामीण भागात वीज पोहोचवणे आणि 24 तास पुरवठा करणे, हे सर्वात मोठे आव्हानात्मक काम आहे. देशात आजही बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी 24 तास वीजपुरवठ्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्राने प्रयत्न करायला (24 Hours Electricity) हवा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.