Chikhali : चिखलीमध्ये महापालिका अधिकारी आणि टपरी व्यावसायिकांमध्ये वाद; परस्पर गुन्हा दाखल

महापालिका अधिका-यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – अनधिकृत टपरी चालकांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे. चिखली मधील साने चौकात अनधिकृत टप-यांवर कारवाई करताना महापालिका अधिकारी आणि टपरी व्यावसायिकांमध्ये वाद झाला. यातून महापालिका अधिका-यांनी टपरी धारकांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा तर टपरी धारकांनी महापालिकेच्या एका अधिका-यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ऍट्रॉसिटी) अन्वये परस्पर गुन्हा दाखल केला.

महापालिकेचे अधिकारी अरुण श्यामराव सोनकुसरे (वय 53, रा. अजमेरा हाऊसिंग सोसायटी, पिंपरी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार इरफान सय्यद, साईनाथ खंडेझोड, मधुकर वाघ, अनिल बारावकर, इरफान चौधरी, अशोक कांबळे आणि अन्य दहा ते पंधरा लोकांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 31) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास साने चौक चिखली येथील ओम साई मार्केटच्या समोर पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमण कारवाई सुरु होती. त्यावेळी आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून महापालिका अधिका-यांना ‘तुम्ही कारवाई थांबवा’ असे म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. आरोपी साईनाथ खंडेझोड याने ‘परत आमच्या लोकांवर कारवाई केल्यास ऍट्रॉसिटी दाखल करून बरबाद करीन’ अशी धमकी दिली. सर्वांनी मिळून फिर्यादी सोनकुसरे करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच्या परस्पर विरोधात साईनाथ रामभाऊ खंडीजोड (वय 52, रा. स्पाईन रोड, माउली सोसायटी, घरकुल, चिखली) यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार अरुण सोनकुसरे यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईनाथ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, साने चौक चिखली येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी कारवाई करत होते. त्यावेळी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ पिंपरी चिंचवड या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अधिका-यांना कारवाई न करण्याची विनंती केली. मात्र आरोपी अरुण यांनी ही विनंती धुडकावून लावत फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.