Pimpri : गुणवंत कामगार कल्याण परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

एमपीसी न्यूज – राज्यस्तरीय गुणवंत कामगार कल्याण परिषद पिंपरी-चिंचवड शहरात होणार आहे. या परिषदेचे निमंत्रण आज (मंगळवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अन्नधान्य पुरवठा आणि ग्राहक सुरक्षा मंत्री गिरीश बापट यांना देण्यात आले. परिषदेचे स्वागताध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि गुणवंत कामगार कल्याण परिषदेचे कार्याध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी निमंत्रण दिले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यस्तरीय गुणवंत कामगार कल्याण परिषदेचे निमंत्रण यापूर्वी मला मिळाले आहे. या कार्यक्रमाला येण्याची माझी इच्छा आहे.” स्वीय सहाय्यकांशी बोलून लवकरात लवकर तारीख द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले.

  • गुणवंत कामगारांच्या मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. याबाबत चर्चा देखील करण्यात आली. राज्यातील गुणवंत कामगारांना मोफत रेल्वे आणि एसटी बस पास मिळावेत. गुणवंत कामगारांना दहा हजार रुपयांपर्यंत पेन्शन सुरु करावी. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 550 चौरस फुटांचे घर मिळावे.

त्याचबरोबर गुणवंत कामगारांना विशेष कार्यकारी अधिकारी पद देण्यात यावे, यांसारख्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या. राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाकडून राज्यातील हजारो गुणवंत कामगारांचा सन्मान करण्यात येतो. गुणवंत कामगार कल्याण परिषदेच्या अध्यक्षा भारती चव्हाण आहेत.

  • पिंपरी-चिंचवड शहरातील सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेला शास्तीकराबाबत आणखी एक निवेदन आमदार लक्ष्मण जगताप आणि कामगार नेते यशवंत भोसले यांनी दिले. त्याविषयी बोलताना एक हजार चौरस फूट घरांचा शास्तीकर माफ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.