Chhajed Parivar Mandal : अ. भा. छाजेड परिवार  मंडळाची कार्यकारिणी बरखास्त, तीन महिन्यात नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – देशभरातील जैन छाजेड समाजाची अग्रणी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय छाजेड परिवार मंडळ बिरामी (जोधपूर) या संस्थेचे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. नियमानुसार जुन्या कार्यकारीणीची बैठक बोलवावी.

निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, महामंत्री, कोषाध्यक्ष यांची सर्वसाधारण सभेत नियुक्ती आणि कार्य समिती गठीत करावी. ही प्रक्रिया तीन महिन्यात करण्याचे आदेश देवस्थान विभागाने दिले आहेत.

राजस्थान देवस्थान विभागाचे जोधपूरचे सहाय्यक आयुक्त ओमप्रकाश पालीवाल यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी विभागीय निरीक्षक म्हणून दीपक कुमार दवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे झालेल्या कार्यकारिणी निवडीच्या विरोधात ‘एमपीसी न्यूज’ने सुरुवातीपासून आवाज उठविला. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. अखेर प्रशासनालाही ‘एमपीसी न्यूज’च्या वृत्ताची दखल घ्यावी लागली आणि बेकायदेशीर कार्यकारिणी बरखास्त करावी लागली.

अ. भा. छाजेड परिवार मंडळाच्या अध्यक्ष निवडीचा वाद देवस्थान समितीकडे गेला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणारे किशोरचंद छाजेडच अध्यक्ष झाले होते. घटनेच्या विरुद्ध प्रक्रिया करण्यात आल्याचा आक्षेप घेत कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी करत ताराचंद तगराज मेहता आणि पारसमल बी छाजेड यांनी जोधपूर येथील देवस्थान समितीकडे तक्रार केली होती.

त्यावर सुनावणी झाली. 16 जून रोजी झालेल्या सुनावणीत कार्यकारी मंडळाच्या खर्चावर निर्बंध घातले होते. दोन्ही गटाची बाजू जाणून घेतल्यानंतर 10 जून रोजी झालेल्या सुनावणीत कार्यकारणी बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले.

काय आहे घटना?

सहाय्यक आयुक्त ओमप्रकाश पालीवाल यांनी मंडळाच्या घटनेची माहिती घेतली. घटनेतील सहाव्या नियमानुसार मंडळाची एक कार्यकारिणी होईल. त्यात 17 पदाधिकारी, 5 वरिष्ठ सल्लागार आणि 29 सदस्य होतील. 6 ‘ब’नुसार समितीचा कार्यकाळ 3 वर्षांचा राहील. कार्यकाळ संपण्यापूर्वी काही दिवस अगोदर बैठकीत आगामी निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी नेमला जाईल.

वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, महामंत्री, कोषाध्यक्ष यांची निवड सदस्यांमधून केली जाईल. निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडेल. या नवनिर्वाचित पदाधिकऱ्यांचे मत घेत कार्य समितीच्या सदस्यांची निवड केली जाईल. 6 ‘ई’ नुसार सर्वसाधारण सभा 3 वर्षासाठी कार्यकारिणीची नियुक्ती करेल.

काय आहेत आदेश?

माजी कार्यकारी अध्यक्ष अमृतलाल छाजेड यांनी पूर्वीच्या कार्यकारिणीची बैठक बोलवावी. नियमानुसार निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, महामंत्री, कोषाध्यक्ष यांची सर्वसाधारण सभेत नियुक्ती आणि कार्य समिती गठीत करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

भ्रष्टाचारी व मनमानी कारभाराला चाप!

मंडळात बेकायदेशीर, नियमांना डावलून कामकाज केले जात होते. अतिशय मनमानी पद्धतीने कामकाज केले जात होते. पैशांचा दुरुउपयोग केला जात होता. कार्यकारी मंडळात नसतानाही  अनेकांना विविध समित्यांवर घेतले गेले. एकत्रितपणे, संगनमताने भ्रष्टाचार करण्यासाठीच समित्यांमध्ये घेतले जात होते. आता कार्यकारी मंडळ बरखास्त झाल्याने भ्रष्टाचारी व मनमानी कारभाराला चाप बसेल, असा विश्वास सभासदांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.