Alandi : शहरातील पात्र दिव्यांगाना 4 लाखांचे विमा कवच; आळंदी नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम
एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषद शहरातील दिव्यांग बांधवांसाठी (Alandi) सतत प्रयत्नशील असते.आजवर पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर आर्थिक मदत पाठविणे, विविध उपयोगी साहित्य पुरविणे अशा प्रकारे केल्या जात असलेल्या मदतीच्या एक पाऊल पुढे जावून आळंदी नगरपरिषद मार्फत दिव्यांगाचा 4 लाखाचा विमा उतरविला गेला आहे.
आळंदी नगरपरिषद मार्फत नगरपरिषद हद्दीतील पात्र दिव्यांग लाभार्थीसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या केंद्र सरकार पुरस्कृत योजना लागू करून या योजनांचा वार्षिक प्रीमियमची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
आजच्या घडीला प्रत्येकाचा विमा असणे व गुंतवणूक करणे आवश्यक झालं आहे. विमा उतरविल्याने कुटुंबातील इतर सदस्यांना अडचणीच्या काळात आर्थिक आधार मिळतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने दिव्यांगाना आर्थिक मदत करण्यापलीकडे जावून त्यांना शासकीय विमा योजनांचा लाभ मिळवून देण्याचं मोठा निर्णय आळंदी नगरपरिषदेने घेतला. अशा प्रकारे दिव्यांग बांधवांना विमा कवच लागू करणारी पुणे जिल्ह्यातील ही कदाचित पहिलीच नगरपरिषद आहे.
Ajit Pawar : अजित पवार यांनी केला मेट्रोने प्रवास; प्रवाशांसोबत साधला संवाद
या दोन योजनांचे फायदे लक्षात घेता आळंदी नगरपरिषद हद्दीतील ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा‘ योजनाच्या 22 पात्र लाभार्थ्यांच्या तर ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा‘ 41 पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रीमियमची रक्कम जमा करण्यात आली आहे.
या योजनांचा विमा कालावधी 1 जून ते 31 मे असल्याने दरवर्षी 31 मेच्या आधी ही वार्षिक (Alandi) हफ्त्याची रक्कम नगरपरिषद मार्फत पात्र लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. शहरातील पात्र वयोगटतील दिव्यांगांना 4 लाखांचे विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण घोडे, वैशाली पाटील यांनी स्वतः लाभार्थ्यांच्या घरी जावून फॉर्म भरून घेवून बँकांशी समन्वय साधून परिश्रम घेतले.
“नेहमीच्या आर्थिक साहाय्याच्या स्वरुपातील मदतीबरोबरच शहरातील पात्र दिव्यांग बांधवांना विमा कवच देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे व त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबास अडचणीच्या काळात मोठा आर्थिक आधार उपलब्ध होईल असा विश्वास वाटतो.” – मुख्याधिकारी कैलास केंद्रे
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
1) लाभार्थी – 18 ते 50 वर्ष वयोगटातील नागरिक
2) वार्षिक प्रीमियम – 436 रु. + सेवाकर
3) लाभ – कोणत्याही कारणामुळे विमा धारकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नामनिर्देशित वारसाला 2 लाख रुपयांची रक्कम मिळते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Alandi)
1) लाभार्थी – 18 ते 70 वर्ष वयोगटातील नागरिक
2) वार्षिक प्रीमियम – 20 रु. + सेवाकर
3) लाभ – (अ)अपघातामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित वारसाला 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
(ब) विमाधारकाला पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये तसेच
(क)आंशिक अपंगत्व आल्यास 1लाख आर्थिक साहाय्य.