Chikahli : एस.एस.पी. शिक्षण संस्थेतर्फे सिंधुताईंचा ‘सावित्री पुरस्कारा’ने गौरव

एमपीसी न्यूज – गरिबीत लाजू नका, श्रीमंतीत माजू नका. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये वाटेवर काटे असतात, तुमच्याही आहेत आणि म्हणूनच काट्यांशी दोस्ती करा, काटे बोचले तरी सहन करा, संकटांवर मात करा आणि तुमच्याकडे येणाऱ्या सर्वांच्या दुःखावर प्रेमाने फुंकर घाला,’ असा जगण्याचा सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी दिला.

चिखलीतील नेवाळेवस्ती येथील एस.एस.पी. शिक्षण संस्थेच्या गणेश इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने दिला जाणारा पहिला ‘सावित्री पुरस्कार’ देऊन सिंधूताई सपकाळ यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

  • कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. बी. पाटील, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, हर्षदा साने, प्राची मळेकर, गणेश पाटील, आकाश पाटील, मंगेश पाटील, स्नेहल पाटील, प्राचार्या सोफिया बानो इनामदार, शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश गायकवाड, सल्लागार रितू गुळवणी, व्यवस्थापक सुनील शेवाळे, दापोडी येथील गणेश स्कूलचे प्राचार्य दत्तात्रय घारे, माजी प्रशिक्षण अधिकारी हरी भारती, राजेश व्हटकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सिंधूताई म्हणाल्या, आई-वडिलांच्या भावनांना जपा. पत्नीचं दुःख समजायला शिका. बाई नाही, तर काही नाही. मी जगली तुम्हीही जगा. भाकरीचं नातं घट्ट असतं. त्यामुळे वाईट विचार येत नाही. माफ करायला शिका तरच मोठे व्हाल. दुःखाला शोधा. जे आपल्याला मिळाले नाही. ते दुसर्‍यांना दिले, तर त्यात आत्मतृप्ती असते. एस.बी. पाटील हे खूप संघर्षातून इथपर्यंत पोहोचले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.