Chinchwad : सरोज राव यांचे आकस्मिक निधन

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड मधील नामवंत अभिनेत्री आणि निवेदिका सरोज गणेश राव (वय 54) यांचे काल बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. बुधवारी घरामध्ये टीवी पाहत असताना अचानक त्रास सुरु झाल्याने त्यांना तातडीने चिंचवडच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती गणेश राव, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या, शुक्रवारी सकाळी 9 वाजता निगडी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आयुष्यात असलेल्या दुर्धर आजारावर मात करुन सदैव उत्साही असणारे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व असे सरोज राव यांचे वर्णन करता येईल. आजारामुळे त्यांची कार्यशक्ती थोड्याच प्रमाणात होती. पण त्यांची इच्छाशक्ती मात्र जबरदस्त होती. त्याच्याच जोरावर शारीरिकदृष्ट्या अनेक निर्बंध असतानाही त्या शेवटपर्यंत अत्यंत उत्साहाने प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत असत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित स्वरसागर महोत्सवात त्यांचे नेहमी अभ्यासपूर्ण निवेदन असे. तसेच इतरही अनेक कार्यक्रमात त्यांच्या हलक्याफुलक्या आणि ओघवत्या निवेदनाने रंगत आणत असत. खेळ रंगला पैठणीचा, होममिनिस्टर यासारख्या कार्यक्रमांचे त्या यशस्वीरित्या आयोजन करीत असत. तसेच टाकाऊतून टिकाऊ, छंद वर्ग, संस्कारभारती रांगोळी या प्रकारात त्या तरबेज होत्या. त्यांनी त्यांच्या छंद वर्गांच्या कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित केल्या होत्या. पिंपरी-चिंचवडमधील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी त्यांच्याच विद्यार्थी-विद्यार्थिनींची रांगोळी नेहमी प्रवेशद्वारापाशी असे. तसेच अभिनयवेड जोपासणा-या सरोज यांनी अनेक मालिका व चित्रपटात अभिनयदेखील केला होता. मनाने तसेच व्यक्तिमत्वाने देखील सदैव तरुण असणा-या सरोज राव यांची अशा रितीने अकाली एक्झिट सर्वांना चटका लावून गेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.