India News : पद्म पुरस्कारांसाठी नामांकने पाठविण्यास 15 सप्टेंबर पर्यंत मुदत

एमपीसी न्यूज – प्रजासत्ताकदिनी जाहीर करण्यात येणार्‍या पद्म पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन नामांकन/ शिफारशी, स्वीकारण्याची सुरुवात 1 मे 2023 पासून झाली असून पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/ शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in ) वर ऑनलाइन स्वीकारल्या जात आहेत.

Chinchwad : आषाढी एकादशी निमित्त वाल्हेकरवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यक्रम

पद्म पुरस्कार, अर्थात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये प्रारंभ झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते. हा पुरस्कार विविध क्षेत्रातील ‘असामान्य कर्तृत्वाचा’ सन्मान करण्यासाठी दिला जातो.

कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारखी सर्व क्षेत्रे/ विषयांमध्ये विशिष्ट आणि अद्वितीय कामगिरीसाठी/ सेवेसाठी हा पूरस्कार दिला जातो. वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र मानल्या जातात. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमांसोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सर्व सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र मानले जात नाहीत.

पद्म पुरस्कारांचे स्वरूप ‘लोकांचे पद्म’ मध्ये रुपांतरीत करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. म्हणूनच, सर्व नागरिकांना स्वतःच्या नामांकनासह इतरांचे नामांकन/ शिफारशी पाठवण्याचे आवाहन केले जात आहे. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती तसेच समाजाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाऊ शकतात.

नामांकन /शिफारशींमध्ये वर निर्देशित केलेल्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात निर्दिष्ट केलेले सर्व संबंधित तपशील दिलेले असावेत. यांमध्ये, शिफारस केलेल्या व्यक्तीची संबोधित क्षेत्रातील विशिष्ट आणि अद्वितीय  कामगिरी/ सेवा ठळकपणे मांडणाऱ्या वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीत जास्त 800 शब्द) उद्धरण समाविष्ट  केलेले असावे.

या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) ‘पुरस्कार आणि पदके’ या शीर्षकाखाली आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in ) देखील उपलब्ध आहेत.  या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.