Dighi : खानसामा आणि वेटरने मिळून केला दुस-या वेटरचा खून

एमपीसी न्यूज – धाब्यावर काम करणा-या खानसामा आणि वेटर या दोघांनी मिळून दुस-या एका वेटरचा खून केला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास स्पाईन रोडजवळ नानश्री हॉटेल येथे उघडकीस आली.

ज्ञानेश्वर अंकुश गवळी (वय 20, रा. नानाश्री हॉटेल, वडमुखवाडी, च-होली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिकेत मानसींग राजपूत आणि अन्य एक अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी सध्या फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर बाळासाहेब दिंडे हे वडमुखवाडी येथील नानाश्री हॉटेल चालवतात. त्यांच्या हॉटेलवर मयत ज्ञानेश्वर आणि आरोपी हे काम करतात. ज्ञानेश्वर हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. हॉटेलमधील सर्व कामगार एकाच खोलीत राहतात. ज्ञानेश्वर आणि आरोपी यांच्यामध्ये गुरुवारी रात्री जेवणाच्या वेळी किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यानंतर रात्री हॉटेल बंद केल्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी गेले असता रात्री साडेबाराच्या सुमारास पुन्हा भांडण झाले. यावेळी आरोपींनी ज्ञानेश्वर याला लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत ज्ञानेश्वर गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या शरीराचा एक भाग शरीरापासून दूर सुमारे 200 मीटर अंतरावर टाकून दिला. हॉटेल चालक शेखर दिंडे हॉटेल उघडण्यासाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास आले असता त्यांना हॉटेलमध्ये ज्ञानेश्वर याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. अन्य कामगार हॉटेलवर नव्हते. त्यानुसार त्यांनी तात्काळ दिघी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व अति वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिसांची पथके आरोपीच्या शोधासाठी रावाना करण्यात आली आहेत. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.