Pune News : कौशल्याभिमुख शिक्षण घेण्यावर भर द्यायला हवा विवेक वेलणकर यांचे प्रतिपादन

क्रांतिवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

एमपीसी न्यूज – “आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारायचे असेल, तर कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे. तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी खुणावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत कौशल्याभिमुख शिक्षण घेण्याला अधिक प्राधान्य द्यायला हवे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते व सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Pune News) यांनी केले.

Chikhali : नणंदेने वाहिनीला मारहाण करत घेतला चावा

क्रांतिवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठान, पुणे आयोजित ३३ व्या हिंदू मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात विवेक वेलणकर बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात क्रांतिवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, क्रांतिवीर लहुजी यांचे वंशज किसन जाधव, ठाणे जनता सहकारी बँकेचे उपसरव्यवस्थापक राजीव कुमार मिश्रा, मातंग विकास संस्थेचे अध्यक्ष राजेश रासगे, रामोशी समाजाचे नेते सुनील जाधव, मॉडर्न शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी काळे, डॉ. नंदकिशोर एकबोटे, अशोक लोखंडे आदी उपस्थित होते.

सुहास पासलकर, हरिश्चंद्र कोंढरे, मंगेश नलावडे, अभिजित पतंगे, राजेंद्र जाधव, दीपक पाटील, प्रा. शांताराम पिंगळे, पराग शिवदास, राजू पाटील यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.

क्रांतिवीर लहुजी वस्ताद पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते राजेश रासगे, पूजनीय गोळवलकर गुरुजी पुरस्कार विद्यार्थिनी सोनाली खैरे (सन्मानचिन्ह, श्रीफळ, उपरणे व प्रत्येकी रोख ११ हजार रुपये), वंदनीय लालबहादूर शास्त्री पुरस्कार विद्यार्थी ओंकार खाडे (सन्मानचिन्ह, श्रीफळ, उपरणे व रोख ५ हजार रुपये) यांना प्रदान करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पारितोषिक अस्मिता चंदनशिवे, आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक पारितोषिक ईश्वर आखाडे, संत रोहिदास पारितोषिक सुजाता खडसे व स्वातंत्र्यवीर सावरकर पारितोषिक स्मिता वाघमारे या विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच ८००-९०० मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

विवेक वेलणकर म्हणाले, “दहावी आणि बारावीचा टप्पा महत्त्वाचा असतो. व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्यावर भर दिला पाहिजे. आपल्यातील क्षमता, कला ओळखून करिअरची दिशा ठरवली पाहिजे. आयटीआय, डिप्लोमा, व्होकेशनल कोर्स, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी असे जगभरात मोठी मागणी असणाऱ्या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. त्या समजून घेत आवश्यक शिक्षण घेतले, तर नोकरी व व्यवसायाच्या अनेक वाटा आपल्याला मिळतील.”

प्रास्ताविकात मिलिंद एकबोटे म्हणाले, “अनेक हालअपेष्टा सहन करूनही ज्यांनी हिंदू धर्म सोडला नाही, त्या दलित बांधवाचे आमच्यावर उपकार आहेत, हा गोळवलकर गुरुजींचा विचार घेऊन आम्ही गेली ३३ वर्षे हा कार्यक्रम घेत आहोत. हिंदू समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत हे यश मिळवलेले असते.

दलित, उपेक्षित नाहीत, तर हे प्रगतीशील बांधव आहेत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी योगदान देणाऱ्या लहुजी साळवे, उमाजी नाईक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श ठेवून चांगले शिकावे व राष्ट्र कार्यात योगदान द्यावे.”

राजीव कुमार मिश्रा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. करिअरच्या विविध संधी त्यांनी सांगितल्या. तसेच अभ्यासातील सातत्य, चिकाटी आणि प्रामाणिकपणा तुम्हाला यश मिळवून देते, असे नमूद केले. रोहिणी काळे, राजेश रासगे, सुनील जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शांताराम पिंगळे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.