Pimpri: भाजप, राष्ट्रवादीमध्ये फलक युद्ध!

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे तर माजी उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे लावलेत फलक 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक चौकात मोठ-मोठे जाहिरातीचे फलक लागले आहेत. हे फलक आजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्र्यांचे आहेत. दोन्ही नेत्यांचा आजच वाढदिवस आहे. तसेच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चापेकर स्मारकाच्या संग्रहलायाचे भुमिपूजन करण्यासाठी शहरात येत आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. तर, राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे फलक लावले आहेत. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये फलक युद्ध रंगली असल्याची, जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

पिंपरी-चिंचवड शहर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या किल्ल्याला तडे जाऊ लागले. राष्ट्रवादीचे बडे नेते पक्ष सोडून भाजपात गेले. त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आणि भाजपची एकहाती सत्ता आली. 

आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने चापेकर स्मारकाच्या संग्रहलायाचे भुमिपूजन कार्यक्रमाचे निमित्त साधत शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे शहरभर फलक लावून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पिंपरी, भोसरी, निगडी परिसरात हे स्वागताचे फलक लावले आहेत. तसेच मुख्यमंत्री शहरात येणार असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह निर्माण झाला आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाचे निमित्त साधत राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शहरभर दादांच्या वाढदिवसाचे फलक लावत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरात हे शुभेच्छांचे फलक लावले आहेत. वातावरण निर्मिर्ती करुन पिंपरी-चिंचवड शहर  अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचाच बालेकिल्ला असल्याचे दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील प्रचंड उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, या फलकांवरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फलक युद्ध रंगले आहे. या दोन्ही नेत्यांच्या लागलेल्या फलकांची जोरदार चर्चा शहराच्या राजकारणात सुरु आहे.

"bjp

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.