Pune : व्यावसायिकाचे अपहरण करून चौदा लाख उकळणा-या ड्रायव्हरसह पाच जणांना अटक (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज – वानवडी येथून काही दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाचे चालत्या गाडीतून अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून नातेवाईकांकडून पैसे गोळा करण्यास भाग पाडले आणि चौदा लाख 30 हजार रुपये घेऊन फरार झाले होते. या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाच्या ड्रायव्हरसह पाच जणांना अटक केली.

आरोपींनी राहुल मनोहर कटमवार यांचे (वय-37, रा.सिंहगड रोड, पुणे) अपहरण केले होते. याप्रकरणी त्यांनी वानवडी पोलिसात फिर्याद दिली होती. याप्रकरणी फिर्यादींचा ड्रायव्हर विजय नवघणे (वय-26), उत्तम मारुती भामे (वय-28), गौतम वसंत कांबऴे (वय-32), प्रदीप चंद्रकांत वाघ (वय-30) आणि विशाल कैलास शेलार (वय-34) यांना अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 22 मे रोजी फिर्यादी आपले काम आटपून बी.टी.कवडे रोड येथून जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी कार थांबवून बंदुकीचा धाक दाखवत फिर्यादींचे कार आणि ड्रायव्हरसह अपहरण केले. त्यांनी फिर्यादींना जिवंत राहायचे असेल तर नातेवाईकांकडून पैसे गोळा करण्यास सांगितले. फिर्यादींनी पत्नी आणि नातेवाईकांकडून चौदा लाख 30 हजार रुपये गोळा करून त्यांना दिले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादींना बावधन परिसरात सोडले.

दरम्यान कटमवार यांनी 25 मे रोजी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी मोबाईल डम्प डाटा आणि सीडीआर तपासला असता यातील आरोपी पानशेत आणि खडकवासला भागातील असल्याचे निष्पन्न झाले. या भागात शोधमोहीम सुरू असताना वरील आरोपींनी गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान आरोपींनाही पोलीस आपल्या शोधात असल्याची माहिती मिळाली होती. ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली.

अधिक चौकशीनंतर फिर्यादींचा ड्रायव्हर विजय नवघणे यानेच आपल्या साथीदारांसह हा कट रचल्याचे निष्पन्न झाले. केवळ मौजमजा करण्यासाठी आरोपींनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचा आणखी साथीदार यामध्ये सामिल आहेत काय, या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, याच गुन्ह्यात आरोपी कात्रज येथे कार घेऊन थांबले असताना गस्तीवर असलेले भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी सुरेश सोमलिंग बनसोडे आणि अशोक जकाप्पा मसाळ यांनी अपहरणकर्त्यांना येथे का थांबला अशी विचारणा केली होती. त्यावर आरोपींनी जमिनीच्या व्यवहारातील पैसे घेण्यासाठी थांबलो असल्याचे सांगितले. त्यावेळी या पोलीस कर्मचा-यांनी आरोपींकडून दोन लाख 40 हजार रुपये घेतले होते. या दोघांना यापूर्वीच निलंबीत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.