India ws West Indies Test series : वेस्ट इंडीजची सावध पण दमदार सुरूवात

एमपीएससी न्यूज (विवेक कुलकर्णी) : पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु असलेल्या दोन कसोटीच्या मालिकेतल्या (India ws West Indies Test series ) दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात आज दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडीज संघाने भारतीय संघाच्या 438 धावांच्या आव्हानाला उत्तर देताना  एक बाद 86 धावा करुन दमदार सुरुवात केली आहे.

Pune : त्याने केली ‘Royal exit’ची फेसबुक पोस्ट अन् पोलिसांनी काही मिनिटात घेतला शोध

त्याआधी आज सकाळी खेळ सुरु झाल्यानंतर थोडयाच वेळात कोहली आणि जडेजा या नाबाद जोडीने आपापले वैयक्तिक माईलस्टोन गाठले. विक्रमवीर कोहलीने एक शानदार कव्हरड्राइव्ह मारत आपले 29 वे कसोटी शतक पूर्ण केले. हे शतक  विदेशात जवळपास 4 वर्षांनी,1677 दिवसांनी आलेले कसोटीतले 29 वे, आंतरराष्ट्रीय सामन्यातले एकूण 76 वे शतक पूर्ण करतांना महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी करुन आपला एकूण 500 वा सामना अविस्मरणीय केला.

कोहलीच्या नेहमीच्या खेळीपेक्षा ही खेळी नक्कीच वेगळी होती, पण त्याने मैदानावर ठामपणे उभे राहत ही शानदार खेळी करताना टीकाकारांनी केलेल्या अनेक प्रश्नांची आज बॅटनेही उत्तरे दिलीत. एरवी तो स्पष्ट आणि फटकळ बोलण्यासाठीही प्रसिद्ध आहे. कोणाला तो उद्धटपणा वाटतो तर कोणाला त्याची स्वाभिमानी वृत्ती. पण शब्दापेक्षा शूरविराचा पराक्रमच जास्त बोलका असतो. आपल्या 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकी खेळी करणारा कोहली हा जगातला पहिलाच खेळाडू ठरला आहे.

यानंतर अष्टपैलू जडेजानेही आपले 19 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या जडेजाने त्यानंतर सातत्यपूर्ण खेळ करत आपले महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. हे दोघेही उत्तम खेळत असतानाच 159 धावांची मोठी  भागीदारी पुर्ण झालेली असताना 121 धावांवर खेळणारा कोहली धावचित झाला. त्याने 206 चेंडू खेळून ही ऐतिहासिक खेळी पूर्ण केली. यानंतर भारतीय संघ वेगवान खेळ करेल आणि आपला डाव घोषित करेल असे वाटत होते मात्र रोहित शर्माने या शक्यता खऱ्या होवू दिल्या नाहीत. जडेजा सुद्धा अप्रतिम खेळत होता अन आपल्याला शतकाला  गाठेल असेही वाटत होते मात्र त्याला रोचने चकवले आणि जडेजाची 61 धावांची खेळी संपुष्टात आली.

यानंतर अश्विन आणि नवोदित किशन या जोडीने डाव पुढे सुरू ठेवला. पहिल्या कसोटीत विशेष संधी न मिळालेल्या किशनला या कसोटीत पुरेशी संधी मिळाली पण त्याला ती साधता आली नाही. तो केवळ 25 च धावा करू शकला. त्यानंतर मात्र अश्विनने आक्रमक खेळत आपले वैयक्तिक 14 वे अर्धशतक पुर्ण करताना संघाला 400 च्या पुढे नेण्यात मोठा वाटा उचलला. त्याच्या खेळामुळेच भारतीय संघ 438 धावा उभारू शकला. अश्विनने 8 चौकार मारत 52 धावा केल्या. वेस्ट इंडीज कडून केमार रोच आणि वारीकन यांनी प्रत्येकी 3 तर जेसन होल्डरने दोन बळी मिळवले.

यानंतर वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार ब्रेथवेट आणि तेजनारायण चंद्रपॉल जोडीने यजमान संघाच्या डावाची शानदार सुरुवात केली. या जोडीने 71 धावांची आश्वासक सलामी भागीदारी नोंदवून संघाला आश्वासक सुरुवातही करून दिली.भारतीय संघाविरुद्ध नेहमीच चिवट खेळ करणाऱ्या शिवनारायण चंद्रपॉलच्या मुलाने आज 128 चेंडूत 33 धावा करताना तशीच चिकाटी दाखवली.

तो स्थिरावलाय असे वाटत असतानाच जडेजाने आपली कमाल दाखवत त्याची ही खेळी संपुष्टात आणली आणि भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर  मात्र कर्णधार ब्रेथवेट पदार्पण करणाऱ्या मॅकेझीच्या साथीने आणखी नुकसान होऊ दिले नाही आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त होईपर्यंत संघाची धावसंख्या 1 बाद 86 वर नेऊन ठेवली.

ब्रेथवेट 37 तर मॅकेंझी 14 धावा काढून नाबाद आहेत. वेस्ट इंडीज संघ अजूनही 352 धावांनी मागे आहे. उद्या जर विंडीज संघ फॉलोऑन टाळण्यात यशस्वी ठरला तर भारतीय संघाला पुन्हा एकदा फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. सामन्याचा उद्या तिसराच दिवस असल्याने सामना निर्णायक ठरण्याचीच जास्त शक्यता (India ws West Indies Test series ) दिसत आहे. भारतीय संघ मात्र विंडीज संघाला कुठलीही संधी न देता सामना आणि मालिका जिंकण्यासाठीच अधिकाधिक प्रयत्न करेल हे निश्चित.

संक्षिप्त धावफलक
भारत
पहिला डाव सर्वबाद 438
कोहली 121,जडेजा 61,अश्विन 52,रोहित 80,जैस्वाल 57
रोच 104/3,वारीकन 89/3,होल्डर 57 /2
वेस्ट इंडीज
1 बाद 86
चंद्रपॉल 33,ब्रेथवेट नाबाद 37
जडेजा 12/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.