India : भारताची वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी): युवा अन प्रतिभावंत यशस्वी जैस्वालच्या शानदार ( India)  शतकी खेळीच्या जोरावर अन त्याला कर्णधार रोहित शर्माची मिळालेली योग्य साथ यामुळे भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला तेव्हा भारतीय संघाने 2 बाद 312 धावा केल्या आहेत,

त्यामुळे भारतीय संघाकडे 162 धावांची आघाडी असून अद्यापही भारतीय संघाचे 8 गडी शाबूत असल्याने भारतीय संघ मोठी आघाडी घेऊन  यजमान विंडीज संघाला डावाच्या फरकाने हरवेल अशीच शक्यता आता तरी दिसत आहे.

वेस्ट इंडीज येथील डोमनीका विंड सर येथील मैदानावर सुरु असलेल्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यावर घेतलेली पकड आणखीन मजबूत करण्यात यश मिळवले आहे.

कालच्या नाबाद 80 वरून आज खेळ पुढे सुरू करताना कालची नाबाद जोडी यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहितने आजही शानदार अन तितकीच प्रगल्भता दाखवत खेळपट्टीचे स्वरुप पूर्णपणे जाणून घेत कसोटीला साजेसा खेळ केला. ज्यामुळे या दोन्हीही फलंदाजांनी आपापल्या वैयक्तिक शतकाला गवसणी तर घातलीच पण संघालाही मजबूत स्थितीत आणून ठेवले.

Pune : केळकर समाधीस्थळ बचाव कृती समिती स्थापन होणार

आज खेळ सुरु झाल्यावर थोड्याच वेळात दोघांनीही प्रथम आपापले अर्धशतक पूर्ण केले,त्यानंतर एकाग्रता आणखी दृढ करत मोठया खेळीकडे कूच करण्यास सुरुवात केली.

आयपीएलमध्ये जबरदस्त आक्रमक खेळी  करणाऱ्या यशस्वीने आज मात्र जबरदस्त टेम्परामेन्ट दाखवत कसोटीला साजेशी खेळी करत उत्तम प्रगल्भताही दाखवली,.

त्याने कर्णधार रोहितच्या आधी आपल्या पहिल्या कसोटीतच शतकाला गवसणी घालत विंडीज भूमीवर पदार्पण करताना शतक करणारा पहिला सलामीवीर असा नवा विक्रम आपल्या नावावर केला.

यशस्वी जैस्वालने चौकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले.आपल्या पहिल्याच कसोटीत अर्धशतक करणारा तो आठवा भारतीय ठरला.

त्यानंतर थोड्याच वेळात कर्णधार रोहितनेही आपले 10वे शतक पूर्ण करुन भारतीय संघाला ठोस सुरुवात करून दिली.

यशस्वीने पदार्पणातच शतक पुर्ण करत अशी कामगिरी करणारा तिसरा सलामीवीर तर एकूण 17 वा भारतीय हा बहुमान पटकावला.

तर रोहित सोबत 204 ची सलामी भागीदारी करत वेस्ट इंडीज मध्ये सर्वाधिक सलामीचा नवा विक्रम केला.

या आधी वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर यांच्या नावावर 201 धावाच्या भागीदारीचा विक्रम होता.यशस्वीने 213 चेंडूत 12 चौकार मारत हे  शतक पूर्ण केले.

यशस्वीच्या या खेळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही खेळी विदेशात झाली, आणि अशी कामगिरी करणारा तो चौथा आणि विंडीजमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

एकूणच आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करण्यात जैस्वाल “यशस्वी” ठरला आहे.या कामगिरीला अविस्मरणीय बनवणाऱ्या कर्णधार रोहितनेही त्यानंतर थोड्याच वेळात आपले एकूण दहावे शतक पूर्ण करुन आपणही फॉर्मात आलो असल्याचे सिद्ध केले, हे त्याचे विदेशातले दुसरे कसोटी शतक ठरले.

रोहितने 221 चेंडूत आपले शतक पूर्ण करताना 10चौकार आणि दोन षटकार मारले.

पण आपले शतक पुर्ण होताच रोहित अथानजेच्या गोलंदाजीवर पायचीत होवून तंबूत परतला.

रोहित आणि यशस्वीने पहिल्या विकेटसाठी 229 धावांची विक्रमी सलामी भागीदारी नोंदवली.

विंडीजने ही विकेट डावाच्या 76 व्या षटकात मिळवली.यानंतर खेळायला आला तो शुभमन गील पण त्याला आज मात्र विशेष अशी कामगिरी करता आली नाही.

तो केवळ 6 धावा करुन वारीकनच्या गोलंदाजीवर अथानजेच्या हातात झेल देवून  तंबूत परतला.

त्यानंतर खेळायला आला तो भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली.या जोडीने त्यानंतर मजबूत खेळ करत विंडीज गोलंदाजांना पूर्णपणे निराश करत उर्वरित खेळात आणखी नुकसान न होऊ देता संघाची आघाडी 162 पर्यँत वाढवण्यात यश मिळवले.

आपल्या शतकी खेळीला जवळजवळ दीडशतकी खेळी पर्यंत नेणारा यशस्वी  143 धावांवर तर कोहली 39 धावांवर नाबाद आहे.

जैस्वाल द्विशतकी खेळी करण्यात यशस्वी होईल का हे बघणे अत्यंत औत्सुक्याचे असेल तर कोहलीही आणखी एक शतक करून विंडीज संघाच्या   दुबळ्या गोलंदाजीचा योग्य फायदा उचलेल का हे ही तितकेच औत्सुक्याचे ( India) असेल.

संक्षिप्त धावफलक
विंडीज
पहिला डाव
सर्वबाद 150
भारत
पहिला डाव
2 बाद 312
रोहित 103,गील 6,यशस्वी नाबाद 143,कोहली नाबाद 39

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.