Pune : दिव्यांगांना सन्मानाने जगण्याची संधी देण्याला प्राधान्य हवे – ‘आरएसएस’चे भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

दिव्यांग कल्याणकारी संस्थेतर्फे पुस्तकांचे प्रकाशन व रायफल शूटिंग स्पर्धेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – “जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसते. आपल्याला केवळ शारीरिक विकलांगपणा दिसतो. मात्र, वैचारिक दुर्बलता, विकृत मानसिकता हेही विकलांग असण्याचे लक्षण आहे. शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना ‘दिव्यांग’ संबोधून त्यांना सन्मान दिला गेला आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणून सन्मानाने जगण्याची संधी देण्याला आपण प्राधान्य द्यायला हवे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश उर्फ भैय्याजी जोशी(Pune) यांनी केले.

दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र, सक्षम पश्चिम महाराष्ट्र आणि क्रिडा भारती पश्चिम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांची यशोगाथा व ३५ वर्षापासून संस्थेची यशस्वी वाटचाल असलेल्या ‘कथा आत्मनिर्भरतेची’ व ‘विश्वस्त’ या पुस्तकाचे प्रकाशन, तसेच ‘१० मीटर रायफल शूटींग रेंज’ स्पर्धेचे उद्घाटन भैय्याजी जोशी यांच्या हस्ते झाले. वानवडी येथील संस्थेच्या मैदानावर या कार्यक्रमाचे(Pune) आयोजन केले होते.

कार्यक्रमात ‘सक्षम’चे अखिल भारतीय संघटन मंत्री चंद्रशेखरजी, क्रिडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत, कार्याध्यक्ष अॅड. मुरलीधर कचरे, ‘सक्षम’चे महेश टांकसाळे, दत्ता लखे, क्रिडा भारतीचे विजय पुरंदरे, शैलेश आपटे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. गुणवंतांचा सत्कार, तसेच काही दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर, कृत्रिम पाय, कॅलिपर आदी साहित्य प्रदान करण्यात आले.

भैय्याजी जोशी म्हणाले, “दृष्टिकोन, मानसिकता घडविणाऱ्या सामाजिक संस्थांना व मंडळीना अशी पुस्तके मार्गदर्शक ठरतील. दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांना समाजातील दानशूर नेहमीच मदतीसाठी पुढे येतात. परिस्थितीला सामोरे जात त्यावर मात करून स्वताच्या अस्तित्व निर्माण करणार्‍या या मुलांचा अभिमान वाटतो.”

राज चौधरी म्हणाले, “समाजातील दिव्यांग घटकांना आत्मविश्वास देण्यासाठी ही संस्था प्रयत्न करते. समाजिक समरसता इथे नसानसात भिडलेली आहे. प्रत्येकाने नागरी कर्तव्याचे पालन केले पाहिजे. एकदिलाने राहायला हवे. स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर जीवन जगण्याला प्राधान्य हवे. दिव्यांगांच्या मदतीसाठी आपण पुढे आले पाहिजे.”

स्वागत प्रास्ताविकात अॅड. मुरलीधर कचरे म्हणाले, “संस्थेचे हजारो मुलांना घडवलेले आहे. विकलांगतेवर मात करून खऱ्या अर्थाने दिव्यांग होत यश संपादन करत आहेत. या कार्याचा लेखाजोखा मांडणारे हे पुस्तक आहे. मुलांचा सर्वांगाने विकास होण्यासाठी संस्थेचे कार्य यापुढेही मोठ्या जोमाने सुरू राहील.”

संजय भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका शिवानी सुतार यांनी आभार मानले. कार्यक्रमास निमंत्रित तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले संस्थेचे माजी दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक असे एकूण पाचशे लोक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर संस्थेमध्ये सर्वांसाठी स्नेहभोजन आयोजिले होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सक्षमचे सर्व कार्यकर्ते गहीनाथ नलावडे, शिवाजी भेगडे, कुणाल मिठारी, दत्ता लखे, अशोक सोनवणे, राहुल नागटिळक, कृषीका इंदुलकर त्याचबरोबर क्रीडा भारतीचे कार्यकर्ते विजय पुरंदरे, शैलेश आपटे, दीपक मेहंदळे, संजय रजपूत, अर्जुन पुरस्कार विजेती शकुंतला खटावकर व दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे सेवक यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.