Pune : सेवा हाच भारताचा खरा स्वभाव – भैय्याजी जोशी

एमपीसी न्यूज – ‘स्वस्थ भारत’हे आमचे ध्येय आहे. ‘रोगमुक्त भारत’ ही त्यातली ( Pune) पहिली पायरी आहे. प्रत्येक जण निरामय असावा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. शरीर स्वास्थ्यापेक्षा मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न अधिक जटील होत चालला आहे. मानसिकदृष्ट्या व्यक्ती व समाज सक्षम होणे आवश्यक आहे. सेवा हाच भारताचा खरा स्वभाव आणि चेहरा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.

पुणे वैद्यकीय सेवा मंडळ आणि संशोधन प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब देवरस रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक आदर पुनावाला, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे उपस्थित होते. तर केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया, संस्थेचे मानद अध्यक्ष तथा श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज हे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते.

भैय्याजी जोशी म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील सेवेची प्रचंड आवश्यकता आहे. समाजातील एका वर्गाला वैद्यकीय उपचार सहज मिळतात. परंतु, दुसरीकडे वनवासी, कष्टकरी, उपेक्षित घटकातील वर्गाला उपचार मिळत नाहीत. उपचारांची उपलब्धता सर्वांना समान पद्धतीने मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी सेवेचा मंत्र दिला त्यांच्या नावाने हे रुग्णालय सुरू होत आहे हीच खरी रुग्णालयाची संपदा आहे. या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या मंडळींचा भावात्मक पक्ष खूप मजबूत आहे त्यांचा सेवा भाव खूप मजबूत आहे त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होईल यात शंका नाही. उलट या नावासोबतच जबाबदारी अधिक वाढली आहे. साधने उपलब्ध करता येतात. परंतु, समर्पित भावना निर्माण करणे अधिक महत्त्वाचे असते. कोरोना काळात सामाजिक संस्था व व्यक्तींनी केलेली मदत व सेवाभाव हा भारताचा वेगळेपणा आहे, असे मदत कार्य आपल्याला जगभरात कुठेही पाहायला मिळाले नाही. असेही देवरस म्हणाले.

दृकश्राव्य माध्यमातून मनसुख मांडवीया म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरिद्री नारायण आणि ‘दरिद्री देवो भव’ हा मंत्र घेऊन काम करीत आहे. संघ कार्यकर्ता सेवा करण्यात सतत आघाडीवर असतात. कोणत्याही आपत्तीमध्ये ते सेवेसाठी हजर असतात. आरोग्य भारतीच्या विविध प्रकल्पांमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. ही सेवा भावना कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये पाहायला मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी पाहिलेली आहे. त्यामुळेच त्यांनी सर्वांसाठी जनआरोग्य योजनेसारख्या योजना आणल्या आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोविड निमित्ताने आपण आरोग्याच्या क्षेत्रामध्ये किती मागे आहोत याची जाणीव झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक गोष्टीमध्ये आपण आधुनिकता प्राप्त केली. उपकरणे, औषधोपचार, संशोधन आणि आरोग्य क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ आपल्याकडे नव्हते. ते वाढवण्यास याच काळात सुरुवात करण्यात आली. संघाच्या माध्यमातून दूरदृष्टी ठेवून वैद्यकीय क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्याचे पाटील म्हणाले. लातूर येथील विवेकानंद रुग्णालय, संभाजीनगर येथील डॉ हेडगेवार रुग्णालय, नाशिक येथील गुरुजी रुग्णालय, विविध रक्तपेढी हे त्याचेच द्योतक असल्याचे ते म्हणाले.

सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला म्हणाले, आरोग्य हा सर्वसामान्यांचा प्राथमिक अधिकार आहे. सर्वसामान्यांना परवडणारे उपचार मिळणे कठीण झाले आहे. सिरमच्या स्थापनेपासूनच सर्वसामान्यांच्या वेदना कमी करण्यासाठी काम केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा देऊन आरोग्य क्षेत्रात देखील मोठी क्रांती घडवण्यास सुरुवात केली आहे. भारत देशासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही समाधानी असल्याचे ते म्हणाले.

गोविंद देवगिरी महाराज यांनी आपल्या दृकश्राव्य माध्यमातून दिलेल्या संदेशामध्ये डॉ. हेडगेवार यांनी संघटनेचा मंत्र दिला. श्री गुरुजींनी संस्काराचा मंत्र दिला तर सेवेचा मंत्र बाळासाहेब देवरस यांनी दिल्याचे सांगितले. पिडाग्रस्त लोकांची सेवा हे देशसेवेचे माध्यम आहे. धर्माचे साधन आणि संस्कारांचे शिखर सेवा असल्याचे ते म्हणाले. सेवेची भावना आजच्या काळातही संघ आणि साधु संतामुळे जिवंत असल्याचे त्यांनी नमूद केले. सेवेतच जीवनातील सार्थकता असून समाज ऋण फेडणे म्हणजे जीवन धन्य करणे होय असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिरीष ( Pune) देशपांडे यांनी केले. तर सूत्रसंचालन अनिरुद्ध दडके यांनी केले. प्रतिष्ठानचे कार्यवाह बद्रीनाथ मूर्ती यांनी आभार मानले. यावेळी डॉ. बहार कुलकर्णी आणि डॉ. अजित कुलकर्णी यांनी रुग्णालयाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. डॉ. तेजस्विनी यांनी सेवा गीत सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.