Raigad News : इर्शाळगड दरड दुर्घटना; 75 जणांना बाहेर काढण्यात यश

एमपीसी न्यूज – रायगड (Raigad News) जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळगड गावातील एका वस्तीवर बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत शंभर पेक्षा अधिक नागरिक अडकले असल्याची शक्यता आहे. त्यातील 75 जणांना बाहेर काढण्यात आले असून दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
इर्शाळगड गावात 45-47 घरे आहेत. गावातील लोक रात्रीच्या वेळी झोपेत असतानाच रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रात्रीच्या वेळी आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांनी मदत कार्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्निशमन, खालापूर पोलीस अशी बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. बचाव कार्य सुरू असताना अग्निशमन विभागातील एक जवान खूप दम लागल्याने मृत्युमुखी पडला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण दुर्घटनेची माहिती घेऊन मदत कार्याबाबत सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले गावामध्ये सुमारे 45 ते 47 घरे आहेत. त्यातील 15 ते 17 घरांवर दरड कोसळली आहे.
एनडीआरएफ, एसडीआरएफ स्थानिक बचाव पथके यांच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे. हा भाग अतिशय दुर्गम ठिकाणी असल्याने येथे वाहने जाऊ शकत नाहीत. बचाव कार्य प्राधान्याने सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर लोक देखील बाहेर पडले आहेत. तरीही आणखी 15 ते 20 लोक अडकले असल्याची शक्यता आहे.
इर्शाळगड दुर्घटनेत मदत कार्यासाठी राज्य सरकारने दोन हेलिकॉप्टर तयार ठेवले आहेत. मात्र दाट धुके आणि सातत्याने पडणारा मुसळधार पाऊस यामुळे हवामान खराब झाले आहे. हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत करण्यासाठी अडथळा येत असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.