Pimpri: जनता मोदी, ‘फसवणीस’ सरकारला वैतागली – धनंजय मुंडे (व्हिडीओ)

यापुढे कोणतीही लाट येणार नाही; ‘अभि नही तो  कभी नही’ याप्रमाणे काम करा      
                                                                                                                                                                                                                                             एमपीसी न्यूज – देशभरातील आणि महाराष्ट्रातील जनता मोदी आणि ‘फसवणीससरकारला प्रचंड वैतागली आहे. 15 लाख खात्यात जमा झाले नाहीत अन्  रोजगारही मिळाला नाही. हे सरकार पळपटू आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. महागाईने कंबरडे मोडलेली जनता आता पर्याय शोधत आहे. जनतेला भाजपला मतदान करायचे नाही. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेला पर्याय निर्माण करा. त्यासाठी मतदारांच्या घरा-घरांपर्यंत पोहचा. बूथ संघटना मजबूत करा, असे मार्गदर्शन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले. बूथ संघटन मजबूत केल्यास राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकांचा पक्ष होईल. त्यानंतर अजितदादांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही, असेही ते म्हणाले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज  (रविवारी) भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात युवक काँग्रेसतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील ‘बूथ सक्षमीकरण मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष प्रदिप गारटकर, युवकाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, माजी खासदार रणजित मोहिते- पाटील, माजी आमदार विलास लांडे, बापू पटारे, अशोक पवार, रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, पुणे  महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, पिंपरीच्या महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, भाऊसाहेब भोईर यांच्यासह आजी- माजी नगरसेवक उपस्थित होते.

धनंजय मुंडे म्हणाले, ‘आगामी निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे पक्ष संघटन करण्यावर भर द्या. बुथ कमिटीला अन्ययसाधारण महत्व आहे. बुथ प्रमुख करुन चालणार नाही. मतदार यादीतील पानाचा एक प्रमुख करा.  हे काम अतिशय सोपे काम आहे. एका बुथवर साधारण 800 मतदार असतात. त्यापैकी मतदार यादीतील पान प्रमुखांकडे 60 लोकांची जबाबदारी सोपविण्यात यावी. पान प्रमुखाने 60 मतदारांच्या घरी चार ते पाच वेळेस जावे. मतदाराच्या घरी गेल्यानंतर गॅस आहे का विचारावे आणि 2014 ला किती रुपयांना मिळत होता आणि आता कितीला मिळत आहे, याची विचारणा करावी. शेवटी आता बरे वाटते का? असे विचारयाचे आणि घराबाहेर पडायचे. आपोआप तो मतदार मोदी सरकार महिन्याला किती लुटत आहे, याचा विचार करेल. त्यानंतर मतदान राष्ट्रवादीला केल्याशिवाय राहणार नाही’.

तसेच मोदी भक्तांच्या खांद्यावर हात ठेवायचा आणि त्याला विचारायचे गाडीत पेट्रोल भरले का? आज पेट्रोलचा भाव किती आहे हे विचारल्यावर त्याचा चेहरा पडल्याशिवाय राहणार नाही. सरकारच्या विरोधात जनतेमध्ये चिड निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेची मानसिकता ओळखून कामाला लागा, अशा सूचनाही त्यांनी युवक कार्यकर्त्यांना दिल्या. 

2014 मध्ये मोठी लाट आली. या लाटेत अनेकांना दिग्जांना पराभवाला सामोरे जावे लागले. गावातील ग्रामपंचायतच्या कार्यालयातही कधी न गेलेला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढलेला माणूस थेट देशाच्या संसदेत गेला. जनतेच्या मानसिकतेच्या विचार करुन भाजपने खोटा प्रचार केला. त्यामुळे ही लाट निर्माण झाली होती. परंतु, आता लाट पुर्णपणे ओसारली आहे. यापुढे कोणतीही लाट येणार नाही. हवेवर, वातावरणावर निवडणूक होणार नाही. साट केवळ एकदाच येते, सारखीच येत नाही. त्यामुळे भविष्य आपले आहे. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही. ही येणारी निवडणूक जीवन मरणाची आहे. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करण्याचे काम करा. आगामी खासदार आणि तीनही विधानसभेचा आमदार राष्ट्रवादीचा असला पाहिजे, असे मुंडे म्हणाले.

"bjp

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.