Kasarwadi : फोटो काढण्यात दंग झालेल्या महिलेची पावणेआठ लाखांची पर्स पळवली

एमपीसी न्यूज – पर्स बाकड्यावर ठेवून फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेलेल्या एका महिलेची पर्स पळवली. त्यामध्ये 30 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह तीन मोबाईल फोन होते. ही घटना कासारवाडीतील गंधर्व गरिमा लॉन्स येथे बुधवारी रात्री घडली.

रामचंद्र गणपतराव झरकर (वय 59, रा. सदाशिव पेठ, लक्ष्मी निवास अपार्टमेंट, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र झरकर हे आपल्या पत्नीसह एका कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या पत्नीला फोटो काढण्यासाठी स्टेजवर बोलवले. यामुळे त्यांच्या पत्नीने पर्स बाकड्यावर ठेवली आणि फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या. त्यावेळी चोरट्याने बाकड्यावर ठेवलेली पर्स चोरून नेली. या पर्समध्ये 10 तोळ्यांचे दोन नेकलेस, 10 तोळ्यांचे दोन सोन्याचे हार, साडेतीन तोळ्यांचे बाजू बंध, कर्णफुले, गंठण, तीन मोबाईल फोन आणि पर्स असा एकूण 7 लाख 77 हजारांचा ऐवज होता. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गाडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.