Pimpri : नाळे प्रकरणानंतर गुन्हे शाखेच्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी लवकरच

सर्व कर्मचाऱ्यांचे 'ट्रॅक रेकॉर्ड' तपासण्याचे काम सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरीच्या संशयावरून एका कामगाराला ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केली. तसेच त्या कामगाराच्या सुटकेसाठी लाखो रुपये उकळले. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी त्या कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त पद्मनाभन यांनी सर्वच कर्मचाऱ्यांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये काही कर्मचाऱ्यांची उचलबांगडी होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

रमेश गबाजी नाळे (वय 56, रा. सिंहगडरोड, धायरी) व राजू त्र्यंबक केदारी (वय 49, रा. कावेरीनगर, वाकड), किरण लांडगे (वय 40, रा. औंध) यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नाळे आणि त्याच्या सहकाऱ्यांना मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी एका तरुणाला ताब्यात घेत बेदम मारहाण केली. तसेच त्याला विजेचा शॉक देखील दिला. तरुणाकडे काहीच मुद्देमाल सापडला नसल्याने त्यास ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करुन त्याच्याकडून आठ लाख रुपये घेतले. हे प्रकरण पोलीस आयुक्तांकडे गेल्याने त्यांनी थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणाची आयुक्त पद्मनाभन यांनी गंभीर दखल घेतली आहे. यापूर्वी गुन्हे शाखेमध्ये नियुक्ती करताना कोणतेही निकष वापरले नव्हते. इच्छुक कर्मचाऱ्यांचे अर्ज मागवून थेट नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या नियुक्त्यांमध्ये चुका झाल्याचे नाळे प्रकरणामुळे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाची हिस्ट्री मागवली. कमर्चाऱ्यांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासत असताना दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड हे असमाधानकारक आढळून आले आहे. त्यामुळे लवकरच त्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी होणार आहे. या वृत्ताला आयुक्त पद्मनाभन यांनी देखील दुजोरा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.