MP Shrirang Barne: ‘लोणावळा-पुणे-लोणावळा लोकल सेवा दिवसभर सुरु ठेवा, सिंहगड एक्सप्रेसचे कोच वाढवा’

एमपीसी न्यूज – लोणावळा-पुणे-लोणावळा या मार्गावर (MP Shrirang Barne) दुपारी 12 ते 2 या दरम्यान एकही रेल्वे धावत नाही. त्यामुळे विद्यार्थी, कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांचा वेळ जातो, अभ्यासही बुडतो. त्यासाठी लोणावळा-पुणे-लोणावळा या मार्गावर पूर्वीप्रमाणे दिवसभर रेल्वे गाड्या सोडाव्यात. तसेच सिंहगड एक्सप्रेसच्या बदललेल्या बोगी व्यवस्थेमुळे सीटांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सकाळी पुण्याहून मुंबईला जाणा-या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यासाठी एक्सप्रेसचे दोन कोच वाढविण्याची आग्रही मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात खासदार बारणे मतदारसंघातील विविध प्रश्नांना वाचा फोडत आहे. लोणावळा-पुणे-लोणावळा या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधताना खासदार बारणे म्हणाले, कोरोना महामारीपूर्वी लोणावळा-पुणे या मार्गावर दिवसभर लोकल ट्रेन धावत होत्या. कोरोना काळात रेल्वेसेवा बंद केली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने सर्व रेल्वेगाड्या पूर्णपणे सुरु आहेत. परंतु, मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा-पुणे-लोणावळा दरम्यानच्या मार्गावर सर्व लोकल रेल्वे गाड्या अद्यापही धावत नाहीत. सध्या लोणावळा-पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी 12 च्या अगोदर काही रेल्वे गाड्या धावतात.

Chinchwad News: श्री मोरया गोसावी महाराज महोत्सवाची उत्साहात सांगता

तर, दुपारी 12 ते 2 या वेळेत एकही रेल्वे गाडी धावत नाही. त्यामुळे या मार्गावरुन मोठ्या संख्येने प्रवास करणारे विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, कामगार, औद्योगिक पट्टा असलेल्या तळेगाव दाभाडे, पिंपरी-चिंचवड भागातील सेकंड शिफ्ट केलेल्या कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत लोकलची वाट बघावी लागते. विद्यार्थ्यांचा वेळ जातो. अभ्यासही होत नाही. त्यामुळे लोणावळा-पुणे-लोणावळा या मार्गावर पूर्वीप्रमाणे दिवसभर रेल्वे गाड्यांचे संचलन करण्याची मागणी खासदार बारणे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली.

सिंहगड एक्सप्रेसचे कोच वाढवा – MP Shrirang Barne

सन 2020 मध्ये सिंहगड एक्सप्रेसच्या कोचची संख्या 19 वरुन कमी करत 16 केली. या बदललेल्या कोच व्यवस्थेमुळे सीटांची संख्या कमी झाली. 1908 वरुन 1818 सीट संख्या झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर सिंहगड एक्सप्रेसमध्ये जनरल तिकीटांची सुविधा सुरु केली. ही सुविधा सुरु करताना सिंहगड एक्सप्रेसच्या कोचची संख्या पुन्हा 2 ने कमी केली. आता केवळ 14 कोच आहेत. त्यामुळे सीटांची संख्या कमी होऊन 1300 झाली आहे. 2 कोच कमी केल्याने पुणे-मुंबई-पुणे प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सकाळी पुण्यातून मुंबईला जाणारी सिंहगड एक्सप्रेस पहिली गाडी आहे. त्यामुळे हजारो प्रवासी या गाडीने मुंबईला जातात. सीटांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना उभा राहून प्रवास करावा लागतो. यामध्ये लहान मुले, महिला प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे सिंहगड एक्सप्रेसला 2 कोच वाढवून 16 कोच करावेत. जेणेकरुन जनरल कोचमधून प्रवास करणा-या प्रवाशांना जागा उपलब्ध होईल, अशी महत्त्वपूर्ण मागणीही खासदार बारणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.