Electoral Roll Revision Program: मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा पुणे येथे देशपातळीवरील शुभारंभ

एमपीसी न्यूज – छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे मतदार जनजागृती सायकल फेरीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, निवडणूक उपायुक्त हृदयेश कुमार, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, दिग्दर्शक नागराज मंजुळे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, निवडणूक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण, स्वीप संचालक संतोष अजमेरा आदी उपस्थित होते.

लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी -निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे

उद्घाटन प्रसंगी मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, देशाच्या प्रत्येक भागातील प्रत्येक पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदानही आवश्यक आहे. शहरी भागात मतदार नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने त्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुण्यातून होत आहे.

देशातील दुर्गम भाग, वाळवंट, समुद्रकिनारा, दऱ्याखोऱ्यातील नागरिक मतदानात सहभाग घेतात हे आपले वैशिष्ठ्य आहे. देशात वयाची शंभरी ओलांडलेले २ लाख ४८९ हजार मतदार आहेत. हिमाचल प्रदेशच्या शामशरण नेगी यांनी मृत्यूपूर्वी ३ दिवस आधी टपाली मतदान केले. मतदानाविषयी ही जागरूकता आणण्यासाठी सर्वांनी मतदार जागृतीच्या कार्यात सहभागी व्हावे, निवडणुकीत मतदानाचा हक्कही बजावावा आणि निवडणूक आयोगाचे दूत म्हणून कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. आजची जनजागृती फेरी सर्वसमावेशक असल्याचे नमूद करून या फेरीत खेळाडू, कलाकार, युवक, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी मतदारही सहभागी होत आहेत असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.