Hockeyplayer Benny Boodle: माजी हॉकीपटू बेनी बूडल यांचे निधन

एमपीसी न्यूज: माजी हॉकीपटू, अधिकारी आणि प्रशासर बेंजामिन जेम्स बूडल (Benny Boodle no more) यांचे मंगळवारी प्रदिर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी फ्लोरेन्स आणि एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

क्रीडा वर्तुळात बूडल बेनी म्हणून ओळखले जायचे. हॉकीपटू म्हणून बेनींची कारकिर्द विद्यापीठ स्पर्धेपासून सुरु झाली. बेनी यांनी ५०च्या दशकांत श्रीलंकेत झालेल्या द्विपक्षीय विद्यापीठ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले. भारताचे प्रतिनिधीत्व करणारे बेनी हे पहिले पुण्याचे खेळाडू होते.

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर बेनी सुल्तान अझलन शहा चषक स्पर्धेचे निरीक्षक होते. हैदराबाद आणि जम्मू येथे झालेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतही त्यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.
तत्कालिक महाराष्ट्र हॉकी संघटनेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अखिल भारतीय स्तरावरील बाबासाहेब आंबेडकर हॉकी समितीचे ते अध्यक्ष राहिले होते.

कुमार राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत खेळणारे ते सर्वात तरुण खेळाडू होते. महाराष्ट्र संघाचे कर्णधारपदही त्यांनी भूषविले होते. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली. बेनी यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३.३० वाजता हडपसर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.