Pune : ‘एनआयसीयू’मुळे चिमुकल्यांना जीवदान

इस्राईलचे राजदूत डॅनियल कार्मन यांची ससूनमधील नवजात शिशु विभागाला भेट
 
एमपीसी न्यूज – "देशासाठी नवनिर्माणाचे स्वप्न पाहणाऱ्या या लहानग्यांवर उपचार करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशन करीत असलेले काम पाहून मी प्रभावित झालो आहे. आयुष्यातील पहिल्या आव्हानावर मात करण्यासाठी या चिमुकल्यांना बळ देण्याचे काम या नवजात शिशु अतिदक्षता विभागाने केले आहे. छाब्रिया कुटुंबाने घेतलेल्या जीवदानाच्या या मिशनमधील पुढाकाराचे कौतुक आहे. यापुढेही काम असेच सुरु राहावे." असे मत इस्राईलचे राजदूत डॅनियल कार्मन यांनी व्यक्त केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने व दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सहकार्याने ससून सर्वोपचार रुग्णालयात उभारलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला डॅनियल कार्मन व सहकाऱ्यांनी मंगळवारी भेट दिली. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुकुल माधव फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी त्यांचे स्वागत केले. प्रसंगी डॉ. आरती कानिटकर, डॉ. राजेश कुलकर्णी, डॉ. उदय राजपूत आणि डॉ. इब्राहिम अन्सारी उपस्थित होते. या सर्वांनी ससून रुग्णालय आणि एनआयसीयूमधील आरोग्य सुविधांविषयीची माहिती दिली.
फाउंडेशनतर्फे एप्रिल 2017 पासून 59 खाटांचे नवजात शिशु अतिदक्षता केंद्र सुरु करण्यात आले आहे. राज्याच्या केंद्रस्थानी असलेल्या मल्टीस्पेशालिटी ससून रुग्णालयात नवजात बालकांना जीवदान देण्यासाठी या केंद्राचा मोठा लाभ होत आहे. पुण्यासह परिसरातून अनेक बालरुग्ण येथे येतात. त्यांच्यावर येथे मोफत उपचार केले जातात. वंचित आणि गरीब कुटुंबातील रुग्णाना या सेवेमुळे खूप मदत होत आहे. या अतिदक्षता विभागातील सुसज्ज सुविधा, स्वच्छता आणि प्रशिक्षित डॉक्टर-नर्सेसची टीम पाहून डॅनियल कार्मन यांनी आनंद व्यक्त केला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने ससून रुग्णालयाच्या सुधारणेसाठी सुरु असलेल्या इतर कामाचीही पाहणी यावेळी डॅनियल कार्मन यांनी केली. ससूनमधील सुविधांबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.