PCMC: महापालिका वॉर्ड हेल्थ अॅक्शन प्लॅन

एमपीसी न्यूज – वॉर्ड हेल्थ अॅक्शन प्लॅन तयार करण्याकरिता (PCMC) क्षेत्रीय कार्यालय स्तरावर क्षेत्रीय अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, रुग्णालय प्रमुख, नोडल वैद्यकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून आठ समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

वॉर्ड हेल्थ अॅक्शन प्लॅन” तयार करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी तसेच क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य सेवेशी निगडीत असणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी आज चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहामध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्या विशेष उपस्थितीत कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी अतिरीक्त आयुक्त जितेंद्र वाघ, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, किरणकुमार मोरे, राजेश आगळे, शितल वाकडे, सिताराम बहुरे, उमेश ढाकणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. सुनिता  साळवे, डॉ. संगीता तिरूमनी, डॉ. तृप्ती सागळे, डॉ. रुचिता लोखंडे, डॉ. नासिर अलवी तसेच   युनिसेफच्या शहरी सल्लागार देविका देशमुख आदी उपस्थित होते.

प्रत्येक महानगरपालिकेने एन. एच. एस. आर. सी. द्वारे प्रदान केलेल्या ‘सिटी हेल्थ अॅक्शन प्लॅन’ आराखड्यावर काम करावे, अशा सूचना राज्यशासनामार्फत दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार  महानगरपालिका स्तरावर ‘वॉर्ड अॅन्ड सिटी हेल्थ अॅक्शन प्लॅन’ तयार  करण्याकरिता युनिसेफच्या मदतीने प्रायोगिक तत्वावर महापालिकेच्या वतीने आराखडा तयार करण्यात  येत आहे.

‘वॉर्ड अॅन्ड सिटी हेल्थ अॅक्शन प्लॅन’मधील तत्वे   भविष्यात (PCMC) संपुर्ण महाराष्ट्रात  मार्गदर्शक व दिशादर्शक म्हणून वापरण्यात येणार आहेत. हा आराखडा  तयार करण्याकरिता ‘वॉर्ड हेल्थ अॅक्शन प्लॅन टास्क फोर्स’ समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत सहभागी वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी तसेच क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य सेवेशी निगडीत असणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, पिंपरी चिंचवडमधील आरोग्य व्यवस्थापन उत्तम पद्धतीने सुरु आहे. या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य आणि वैद्यकीय सेवा सुविधा दिल्या जात आहेत.

YCMH : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी बाह्यस्त्रोताद्वारे कर्मचारी भरणार

शिवाय महापालिकेची नवीन रुग्णालये सुरू झाल्यामुळे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची सोय झाली आहे. असे असले तरी  झोपडपट्टी व झोपडपट्टी सदृश्य भागामध्ये आरोग्य सेवेच्या दृष्टीने अधिक  काम करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने  वॉर्ड हेल्थ अॅक्शन प्लॅन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य विषयक योजनांची अंमलबजावणी करताना विविध  समस्या निर्माण होतात. त्या समस्यांवर तोडगा काढण्याकरिता ही टास्क फोर्स समिती कार्यरत असेल. या समिती मार्फत  युनिसेफच्या  मदतीने  शहरी भागात आरोग्याच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी महापालिकेला  नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करता येणे सुलभ होणार आहे.

कोरोना काळात वैद्यकीय सुविधेबाबत आलेल्या अनुभवावरून (PCMC) आरोग्य सेवेतील मर्यादा आणि अधिक काम करण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. आरोग्य सुविधा पुरवित असताना  सर्वांचे सहकार्य आणि समन्वय गरजेचा  आहे. वैद्यकीय विभागासोबत स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, महिला बालकल्याण, नगरविकास, समाजविकास, आरोग्य अशा विविध  विभागांची भूमिका आणि जबाबदारी महत्वाची आहे.

आराखड्याची अंमलबजावणी करण्याकरिता सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद महत्वाचा असून त्यांच्या  कार्यक्षेत्रातील अनुभवाचा उपयोग करून युनिसेफच्या मदतीने पिंपरी चिंचवड शहराचा ‘वॉर्ड अॅन्ड सिटी हेल्थ अॅक्शन प्लॅन’ तयार केला पाहिजे, अशा  सूचना   आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिल्या .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भौगोलिक कार्यक्षेत्रामध्ये आठ क्षेत्रिय कार्यालये तर  वैद्यकीय विभागामार्फत राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीकरीता आठ रुग्णालय झोन स्तर निश्चित करून आरोग्य सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे वॉर्ड हेल्थ अॅक्शन प्लॅन तयार करण्याकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर क्षेत्रीय अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, रुग्णालय प्रमुख, नोडल वैद्यकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून आठ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.