Maharashtra News : पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ

एमपीसी न्यूज – पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय मंगळवारी (दि. 13) झालेल्या मंत्रिमंडळ (Maharashtra News) बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी 5 हजार रुपये प्रति वर्ष आणि आठवीसाठी 7 हजार 500 प्रति वर्ष अशी शिष्यवृत्ती राहील. ही शिष्यवृत्ती 2023-24 पासून लागू राहील. संच एच आणि संच आय करिता 20 हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. पाचवी नंतर 3 वर्षांकरिता आणि आठवी नंतर 2 वर्षांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते.
 मात्र, गेल्या 13 वर्षात यात वाढ झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला 500 रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांस दरमहिन्याला 750 अशी शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती 10 महिन्यांसाठी असते.
सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता किमान 250 रुपये ते कमाल 1000 रुपये प्रति वर्ष तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी किमान 300 ते कमाल 1500 प्रति वर्ष एवढी संचनिहाय शिष्यवृत्ती देण्यात येते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.