Pune: उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रावर आवश्यक उपाययोजना कराव्यात , चंद्रकांत पाटील यांची जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना विनंती 

एमपीसी न्यूज – उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर (Pune)आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी विनंती आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांना केली. तसेच, त्यासंदर्भातील निवेदन आ. पाटील यांनी दिवसे यांना दिले. यावेळी भाजपा लोकसभा निवडणूक प्रभारी दिपक पोटे हे देखील उपस्थित होते. 
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ जानेवारी, पुणे, शिरुर, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी13मे रोजी मतदान होणार आहे. या चारही लोकसभा मतदारसंघात उन्हाची तीव्रता अधिक असून, तापमान सरासरी ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. राज्यातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या टप्प्यांतील आकडेवारी वरुन उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदार मतदानासाठी बाहेर पडण्यास उदासिनता दिसून येत आहे.

 

 

त्या पार्श्वभूमीवर पुण्यात मतदानाचा टक्का वाढावा; यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी विनंती आ. पाटील यांनी निवेदनाद्वारे केली. यात प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्रांवर मंडप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, मतदान केंद्रांवर वैयकीय पथक तैनात करणे, दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
तसेच, निवडणूक आयोगाने दिव्यांग आणि 85 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरी मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र, अनेक ठिकाणी यासाठी आवश्यक प्रक्रिया योग्य पद्धतीने न राबविण्यात आल्याने, ते मतदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे त्यासाठी आवश्यक उपाययोजना करुन मतदान करुन घ्यावे.
त्यासोबतच अनेकदा मतदारांना त्यांची नावे वगळण्यात मतदारयादीतून आल्याची माहिती मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मिळते. त्यामुळे त्यांच्यात निवडणूक प्रक्रियेसंदर्भात रोष निर्माण होतो. त्यामुळे आयोगाने याचे वेळीच सविस्तर स्पष्टीकरण करावे, आदी आशयाचे निवेदन आ. पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांना दिले. यावेळी आ. पाटील यांची  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत वरील सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.