PCMC : विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी उरले फक्त शेवटचे 5 दिवस..

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ता धारकांसाठी 30 जूनपर्यंत विविध (PCMC)  कर सवलती आहेत. या कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे 5 दिवस बाकी असून नागरिकांनी कर सवलतींचा लाभ घेऊन आपला चालू आर्थिक वर्षातील आणि थकीत कर भरावा, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच थकबाकीदारांनी कर न भरल्यास 1 जुलैपासून मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांसाठी 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल 20 टक्के सवलत मिळत आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 2 लाख 52 हजार 296 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा करून विविध कर सवलतींचा लाभ घेतला आहे. महापालिका तिजोरीत तब्बल 334 कोटी रुपये जमा झाले आहेत.

Pimpri : सायक्लाेथानद्वारे अंमली पदार्थ व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त जनजागृती

शहरातील 31 मार्च 2023 अखेर 50 हजारापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या 39 हजार 655 मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडे तब्बल साडेसहाशे कोटी रुपयांचा कर थकीत होता. हा कर वसूल करण्यासाठी विभागाच्या वतीने एसएमएस, कॉलिंग, रिक्षाव्दारे जनजागृती, होर्डिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

4 हजार 122 थकबाकीदारांनी भरला कर
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून जप्ती पात्र मालमत्तापैकी 1598 लोकांनी 11 कोटीचा अंशतः भरणा केला तर 2524 लोकांनी 27 कोटीचा पूर्ण भरणा केला आहे. 39138 थकबाकीदारांपैकी 4 हजार 122 नागरिकांनी म्हणजेच जवळपास 10 टक्क्यांवर लोकांनी पालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन कराचा भरणा केला आहे.

असा जमा झाला कर

ऑनलाईन – 231 कोटी 8 लाख
विविध ॲप – 3 कोटी 79 लाख
रोख.       –  42 कोटी 53 लाख
धनादेशाद्वारे – 27 कोटी 97 लाख
इडीसी- 3 कोटी 52 लाख
आरटीजीएस – 10 कोटी 44 लाख

1 जुलैपासून जप्तीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. जप्तीसाठी एम एस एफ जवान उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दोन ते तीन झोन मिळून एक जप्ती पथक तयार केलेले आहे. येत्या तीन महिन्यात सर्व जप्तीपात्र मालमत्तांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नागरिकांनी 30 जून अखेर आपल्या कराचा भरणा करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

विहित मुदतीत कर न भरल्यास कायद्यातील तरतुदीनुसार महिना 2 टक्के विलंब शुल्क आकारण्यात येते. हे विलंब शुल्क कायद्यातील तरतुदीनुसारच प्रत्येक दिवशी वाढत राहते. त्यामुळे करांची थकबाकी ठेवणे हे अंतिमतः मालमत्ता धारकांसाठी आर्थिक नुकसानीचे आहे आणि हे जप्तीच्या कटू कारवाईपेक्षा अधिक वाईट आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी याचा विचार करून आपला थकीत कर भरलेला केंव्हाही चांगला, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख (PCMC) म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.