Pimpri-Chinchwad : ज्यांनी दुकानावर मराठी पाट्या लावल्या नाहीत; त्यांच्यावर त्वरित कारवाई करा..अन्यथा; मनसेचा तीव्र इशारा

एमपीसी न्यूज : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांप्रमाणे (Pimpri-Chinchwad) पिंपरी-चिंचवडच्या आठही क्षेत्रीय कार्यालयामार्फत, त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने, हॉटेल, आस्थापना यांना त्वरित मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबतचे निर्देश देऊनही ज्यांनी पाट्या मराठीत लावल्या नसतील त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगावे. अथवा मनसे तर्फे पिंपरी चिंचवड शहरात तीव्र आंदोलन केले जाईल. असे निवेदन मनसे तर्फे पिंपरी चिंचवड आयुक्तांना देण्यात आले आहे. त्यावेळी जर काही तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली तर त्यास केवळ आपण जबाबदार असाल याची आपण गंभीर नोंद घ्यावी. असेही या निवेदनात म्हंटले आहे. 

सर्व दुकाने, हॉटेल व इतर आस्थापना यांनी दुकानावर मराठी भाषेत पाट्या/बोर्ड लावणे बंधनकारक असून त्या पाट्या लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने सर्वांना 2 महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत 25 नोव्हेंबर 2023 रोजी संपलेली आहे.

यापूर्वी मराठी भाषेत पाट्या लावण्याविरोधात काही व्यापारी संघटना यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली व दोन महिन्यात सर्व दुकानांवर ठळकपणे मराठी भाषेत पाट्या/बोर्ड लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील अनेक दुकानांवर आजही मराठी भाषेत पाट्या लावलेल्या दिसून येत नाहीत. शहरातील सर्व दुकाने, हॉटेल, आस्थापना यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळणे अपेक्षित असताना बऱ्याच ठिकाणी त्याची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही.

मुंबई महानगरपालिकेने 25 नोव्हेंबर नंतर मराठी भाषेत पाट्या लावल्या नसतील तर त्या दुकानांना कोणतीही नोटीस न देता (Pimpri-Chinchwad) थेट कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे. परंतु, पिंपरी चिंचवड शहरात अशी कारवाई होताना दिसत नाहीये. आपण वरील विषयाचे गांभीर्य ओळखून योग्य ती कार्यवाही कराल व पुढील होणारे आंदोलन टाळाल, अशी अपेक्षा मनसे पदाधिकऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी सचिन चिखले, विनोद भंडारी, सिमा बेलापुरकर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, प्रतिसिह परदेशी, राजु भालेराव, हेमत डांगे, अनिकेत प्रभु, आदिती चावरीया, रुपेश पटेकर, राजु सावळे  सर्व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.