Pimpri: भाजपच्या राजवटीत स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा कचरा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड महापालिकेची तीस-यावर्षी देखील घसरण झाली आहे. याला सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या दुर्लक्षामुळेच स्वच्छ सर्वेक्षणात शहराची घसरण झाल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. तसेच भाजपच्या राजवटीत स्वच्छ सर्वेक्षणात शहराची घसरण झाली असून सत्ताधा-यांचा तीव्र शब्दात त्यांनी निषेध केला आहे.

जानेवारी महिन्यात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले. व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडविणे, या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. या कामासाठी मनपाने अठरा लाख रुपये खर्च केला. परंतु, ही जनजागृती अंमलात येताना दिसली नाही. अठरा लाख रुपयांचा चुराडा करुन केवळ कागदी घोडे नाचवुन हे बोगस काम करण्यात आले आहे.

  • 2016 मध्ये स्वच्छ भारत अभियानात आपले शहर ‘टॉप टेन’ मध्ये होते. देशात 9 व्या क्रमांकावरील महापालिका महाराष्ट्रात अव्वलस्थानी होती. भाजपाच्या राजवटीत 2017 मध्ये शहर पिछाडीवर गेले. 9 व्या क्रमांकावरील आपले शहर थेट 72 व्या स्थानी फेकले गेले. गतवर्षी त्यामध्ये किंचतशी सुधारणा झाली. देशात महापालिकेचा 43 वा, तर राज्यात 6 वा क्रमांक आला. मात्र यंदा देशात 52 तर राज्यात 13 वा क्रमांक आला आहे.

मागील दोन वर्षात महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, ठेकेदार, सल्लागार, संगनमत करुन (रिंग) करदात्या नागरिकांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे घालून आपले खिसे भरण्यामध्ये मदमस्त आहेत. कचरा निविदेतील संगणमत व टक्केवारीमुळे शहरवासीयांची कचराकोंडी करुन त्यांच्या जिवीताशी खेळण्याचा गंभीर गुन्हा सत्ताधारी पदाधिका-यांनी केला आहे. या प्रकरणात कायदेशीर कर्तव्य बजावण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर निष्क्रिय ठरल्याचा आरोपही भापकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.