Pimpri : महापालिकेतर्फे उद्यापासून लोकशाही पंधरवडा

चर्चासत्र, पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभागातर्फे 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त उद्या (शनिवारी, दि. 26) महाविद्यालयीन स्तरावर चर्चासत्र, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य आदींचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय संविधानातील 73 व 74 व्या घटना दुरूस्तीला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मतदार जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगातर्फे हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत नवोदीत मतदारांना मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि त्याचा प्रचार करण्यासाठी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर यांची पिंपरी-चिंचवड महापालिककेतर्फे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

या पंधरवड्यांनुसार 26 जानेवारी रोजी रॅली, तसेच महाविद्यालयीनस्तरीय चर्चासत्र, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य आदींचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महापालिका हद्दीतील पंधरा महाविद्यालयातील नवोदीत मतदार म्हणून नावनोंदणी करणा-या प्रथम शंभर विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देवून सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयीन तरूणाईने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.