Pimpri: पदाचा गैरवापर; डॉ. पवन साळवे यांना सक्त ताकीद, दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – पदाचा गैरवापर आणि किटकनाशक विभागाकरिता औषध खरेदी करण्यास विलंब केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना सक्त ताकीद देत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच त्यांची दोन दिवसाची रजा विनावेतन करण्यात आली आहे. याशिवाय उप मुख्य लेखापाल विजयकुमार इंगुळकर यांना देखील सक्त ताकीद देण्यात आली आहे. याबाबतची कारवाई आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली.

डॉ. पवन साळवे यांनी 9 ऑक्टोबर 2018 रोजी वैद्यकिय रजेकरिता पिंपळे सौदागर दवाखान्यातील प्रभारी वैद्यकिय अधिकारी यांच्याकडील 8 ऑक्टोबर 2018 रोजीचे वैद्यकिय प्रमाणपत्र वैद्यकिय मुख्य कार्यालयात सादर केले होते. त्या पत्राचे अवलोकन केले असता त्यावर रुग्णाची स्वाक्षरी नव्हती. त्याऐवजी डॉ. साळवे यांच्या वाहनचालकाची स्वाक्षरी असल्याचे उघडकीस आले. तसेच रुग्णाला न तपासताच वैद्यकिय प्रमाणपत्र निर्गत केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. त्यामुळे डॉ. पवन साळवे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. डॉ. साळवे यांचा खुलासा संयुक्तिक नाही.

  • डॉ. पवन साळवे यांनी पिंपळे सौदागर दवाखान्यात स्वत: हजर न राहता. आपल्या पदाचा गैरवापर करुन वैद्यकिय प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. दवाखान्यात रुग्ण हजर नसताना त्यास तपासल्याचे दाखवून वैद्यकिय प्रमाणपत्र मिळविणे, हे अतिशय गंभीर आहे. वैद्यकिय संहितेचा भंग करणारे आहे. त्यामुळे डॉ. पवन साळवे यांच्यावर 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच 8, 9 ऑक्टोबर 2018 या दोन दिवसाची रजा विनावेतन करण्यात आली आहे. दंडाची रक्कम त्यांच्या वेतनातून कपात केली जाणार आहे.

तर, दुस-या कारवाईत पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डेंगु, स्वाईन फ्ल्यु यासारख्या साथीच्या आजारामध्ये वाढ झाली असताना किटकनाशक विभागासाठी औषध खरेदी करण्यास विलंब केला. त्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची बाब 19 डिसेंबर 2018 रोजीच्या स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिली. विभागाचे कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी उप मुख्य लेखापाल विजयकुमार इंगुळकर यांची असताना ते स्थायी समितीच्या सभेला गैरहजर राहिले. त्यामुळे दोघांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती.

  • दोघांनी खुलासा सादर केला आहे. त्यामुळे दोघांना एकवेळ संधी म्हणून सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच यापुढे कार्यालयीन कर्तव्यात कसूर केल्यास शास्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या आदेशाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात केली जाणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.