Pimpri : मालमत्ता सर्वेक्षणासाठी पालिका आपल्या दारी; मालमत्तेस मिळणार ‘यूपिक आयडी’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri ) करआकारणी व करसंकलन विभागाच्या शनिवारी पार पडलेल्या करसंवादामध्ये नागरिकांनी ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मालमत्ताकरावरील सवलती, ‘मालमत्ता सर्वेक्षण अभियान’, ‘यूपिक आयडी’बाबत माहिती व मालमत्ताकरविषयक शंकाचे निरसन साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्यामार्फत करण्यात आले. यावेळी विभागाचे अधिकारी, कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

नागरिक व अधिकारी यांच्यामध्ये थेटसंवाद असा उद्देश असलेल्या करसंवादामध्ये शनिवारी विभागाने नागरिकांना विचारलेल्या प्रश्नांबाबत विभागाकडून तत्काळ माहिती पुरवून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश देण्यात आले. तत्काळ शंकाचे निरसन, समस्यांचा तातडीने निपटारा, समस्येच्या निरसनाबाबतचे तातडीच्या आदेशामुळे नागरिकांनी करसंकलन विभागाचे आभार मानले. करसंवादामध्ये साधारण 100पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला.

Pune : प्रेम, भाषा अन स्त्री जन्मावर आधारित मुशायऱ्यांनी जिंकली पुणेकरांची मने

चालूवर्षी तीन लाख करदात्यांनी पहिल्या तिमाहीमध्ये तब्बल 447 कोटींचा कर जमा केला असून, आजपर्यंत तब्बल 570 कोटींचा कर जमा झालेला आहे. सप्टेंबरअखेर ऑनलाइन स्वरूपात मालमत्ताकर भरल्यास सामान्य करामध्ये चार टक्क्यांच्या नवीन आकारणी झालेल्या मालमत्ता धारकांनी तीन महिन्यामध्ये आगाऊ कराचा भरणा केल्यास सामान्य करामध्ये 10 टक्क्यांच्या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहनही करसंवादामधून करण्यात आले.

याचबरोबर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये तब्बल सहा लाख नोंदणीकृत मालमत्ता आहेत. महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने ‘मालमत्ता सर्वेक्षण अभियान’ सुरू करण्यात येणार असून, याद्वारे मालमत्तांची संपूर्ण माहिती जमा केली जाणार आहे. या अभियानामार्फत अत्याधुनिक नकाशे प्रणालीद्वारे ब्लॉकची निर्मिती करून मालमत्तांना विशिष्ट मालमत्ता क्रमांक (यूपिक आयडी – युनिक प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन कोड) देण्यात येणार आहे.

ज्याप्रमाणे नागरिकांना आधार क्रमांक देण्यात आला आहे, त्याप्रमाणे मालमत्तेसाठी ‘यूपिक आयडी’ मिळणार आहे. यामुळे नागरिकांना मालमत्तेसंदर्भात सर्व माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होऊन त्यांचा वेळ वाचणार आहे.

‘डिजी लॉकर’च्या धर्तीवर आता ‘प्रॉपर्टी लॉकर’ची सुविधा…

नागरिकांना केंद्र सरकारद्वारे आपली कागदपत्रे ‘डिजी लॉकर’च्या माध्यमातून एकत्रित सुरक्षित ठेवण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महापालिका आता मालमत्तेसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे ‘प्रॉपर्टी लॉकर’च्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे. ‘यूपिक आयडी’च्या माध्यमातून ही सुविधा मिळणार असून, आपल्या मालमत्तेसंदर्भातील माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

यामुळे आपल्या मालमत्तेसंदर्भात आढावा घेण्यास नागरिकांना मदत होणार (Pimpri) आहे. नागरिकांची डिजिटल गोपनीयता जपली जाणार असून, आपली कागदपत्रे महापालिकेला सार्वजनिक करण्याचा व न करण्याचा अधिकार नागरिकांकडेच असणार आहे. अशा विषयांची सखोल माहिती करसंवादाच्या माध्यमातून शनिवारी देण्यात आली.

मालमत्ता सर्वेक्षणातून महिलांना मिळणार रोजगार…

करसंकलन विभागाने मालमत्ताकर बिलांचे वाटप करण्याचे काम महिला बचतगटांच्या तब्बल १०० महिलांना देण्यात आले. महिलांच्या माध्यमातून १०० टक्के बिलांचे वाटप करण्यात आले. त्याच धर्तीवर ‘मालमत्ता सर्वेक्षण नोंदणी’ अभियानासाठी माहिती संकलित करण्याचे काम बचतगटांच्या महिलांना देण्यात आले असून, यातून त्यांना रोजगार मिळणार आहे.

नागरिकांनी मालमत्ता सर्वेक्षणास सहकार्य करावे…

नागरिकांना आपल्या मालमत्तेची माहिती ठेवता येण्यासाठी, करामधील असमानता दूर करण्यासाठी ‘मालमत्ता सर्वेक्षण अभियाना’चा लाभ नागरिकांना होणार आहे. महापालिकेने सर्वेक्षणासाठी नेमलेले अधिकारी, महिला व सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेले कर्मचारी यांना नागरिकांना मालमत्तेची माहिती देऊन सहकार्य करावे.

महापालिकेच्या करसंवादामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा निपटारा त्याच वेळी करण्यासाठी आम्ही आग्रही असून, नागरिकांनी दरवेळीप्रमाणे येत्या काळातही विभागाच्या प्रत्येक सुविधांचा लाभ घेताना करसंवादातून आपले प्रश्न व शंकाचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन नीलेश देशमुख यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.