Pimpri: बस खरेदीसाठी ना हरकत प्रमाणपत्र द्या; महापौरांची पीएमपीएमएलकडे मागणी

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या अनागोंदी कारभारामुळे पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. बीआरटी मार्गाचे काम होऊनही बसेस अभावी मार्ग सुरू होत नाहीत. त्यामुळे 20 बसेस खरेदीसाठी पीएमपीएमएल प्रशासनाने महापालिकेला ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी महापौर राहूल जाधव यांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षा नयना गुंडे यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात महापौर जाधव यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील संचालक मंडळातील सभासदांना विश्वासात न घेता पीएमपी प्रशासन परस्पर निर्णय घेत आहे. गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या अधिका-यांना पदोन्नती दिली जाते. बसेसची संख्या अपुरी असल्याने महापालिकेने 400 बसेस खरेदीचा विषय मंजुर केला आहे. 40 टक्के हिस्साप्रमाणे शहराला 180 बस मिळणार आहेत.

मात्र, सद्यस्थितीत शहरातील काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता आणि बोपखेल ते आळंदी हे बीआरटीचे दोन मार्ग तयार आहेत. परंतु, बस नसल्यामुळे ते मार्ग सुरु झाले नाहीत. या बीआरटी मार्गावर बस सोडण्यास महामंडळाने असमर्थ असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या मार्गासाठी 20 बसेस खरेदी करण्यासाठी महापालिकेला ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी महापौर जाधव यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.