Pimpri: पार्थ पवार यांच्या फलकावर स्थानिक एकाही नेत्याचे नाही नाव अन्‌ छबी!

कुटुंबातील सदस्यालाच 'प्रमोट' करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणूक मावळातून लढविण्याची शक्यता असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे नववर्षानिमित्त शहरवासियांना शुभेच्छा देण्यासाठी झळकलेल्या फलकावर केवळ तिघांचेच छायाचित्र होते. शहरातील स्थानिक एकाही पदाधिका-याचे फलकावर नाव किंवा छायाचित्र देखील नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा शहरातील नेत्यांवरील विश्वास उडाला की स्थानिक पदाधिका-यांना विश्वासात न घेता फलकबाजी करण्यात आली होती? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पक्षाने कुटुंबातील सदस्यालाच ‘प्रमोट’ करण्याचा निर्णय घेतला आहे की काय? असा संभ्रम पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक मावळ मतदार संघातून लढवून पार्थ पवार राजकारणाचा श्री गणेशा करणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून पार्थ यांचा मावळ मतदार संघात राबता वाढला आहे. मतदार संघातील बहुतांश कार्यक्रमाला त्यांची हजेरी असते. मावळातून अचानक पार्थ यांचे नाव पुढे आल्याने राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी इच्छूक असलेले शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचे नाव मागे पडले आहे.

नवीन वर्षानिमित्त शहरवासियांना शुभेच्छा देणारे पार्थ यांचे फलक मतदार संघात सर्वत्र झळकले होते. या फलकांवर शरद पवार, अजित पवार आणि पार्थ या तिघांचेच छायाचित्र होते. हे फलक पवार यांचे निकटवर्तीय अभय मांढरे यांनी लावले होते. मांढरे यांनी पक्षाच्या आदेशानुसार फलक लावले की स्वत:हूनच फलक लावले होते? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील एकाही स्थानिक नेत्याचे, पदाधिका-याचे छायचित्र या फलकावर नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शहरातील नेत्यांवार विश्वास राहीला नाही का? स्थानिक पदाधिका-यांना विश्वासात न घेता फलकबाजी करत पार्थ यांना ‘प्रमोट’ केले जात आहे का? असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विश्वासात घेतले जात नसल्याने पक्षातील पदाधिकारी देखील खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत. आमचा पार्थ यांच्या उमेदवारीला विरोध नाही. परंतु, विश्वासात तरी घ्यावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे पक्षाने कुटुंबातील सदस्यालाच प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे की काय? असा संभ्रम पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे पार्थ यांच्या स्वतंत्र झळकलेल्या फलकांने राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारण मात्र झळकत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.