Pimpri : आपत्कालीन परिस्थितीत पोलीस मित्र स्वयंसेवकांचे पोलिसांना सहकार्य

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या पूर परिस्थितीमध्ये पोलिसांना मदतकऱ्यामध्ये सहकार्य करण्यासाठी पोलीस मित्र स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन महत्वाचा वाटा उचलला.

सध्या पिंपरी चिंचवड शहरास मुसळधार पाऊस सुरू आहे. शहराच्या परिसरातील पवना, इंद्रायणी, मुळा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आठ दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ओढे नाले सुद्धा भरून वाहत आहेत. पवना धरणाचे दरवाजे उघडले आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. या आपत्कालीन परिस्थितीत पोलीस मित्र स्वयंसेवकाचे पोलीस विभागास मोठे सहकार्य लाभले.

वाल्हेकरवाडी नदीकाठच्या परिसरात तसेच चिंचवड मोरया गोसावी मंदिर परिसर तसेच रहिवासी वस्ती परिसरात पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबियांना स्थलांतरित व्हावे लागले. त्याचप्रमाणे भोंडवे चौक परिसर, रावेत, वाल्हेकरवाडी नदीघाट रस्ता परिसर आणि मोरया गोसावी मंदिर परिसर, बिर्ला हॉस्पिटल पूल या ठिकाणी पवना नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

त्यामुळे अग्निशामक दल, एनडीआरएफ रेस्क्यू टीम तसेच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला गेला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार निगडी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव यांनी पोलिस मित्रांना या बाबत वाहतूक नियंत्रणासाठी मदतीबाबत कळविले. त्यानुसार प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पोलीस मित्र स्वयंसेवक निगडी व चिंचवड विभागामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत आपत्कालीन मदतीकरिता पोहचले. पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला. तसेच चिंचवड परिसरात वाहतूक नियंत्रण करण्यासही सहकार्य केले.

पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव तसेच प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली समिती सदस्य जयेंद्र मकवाना, तुकाराम दहे, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, संदीप सकपाळ, तुषार मकवाना, अमित डांगे, अमोल कानु, पोलीस नाईक विजय पंडित, भुसारे यांनी नागरिकांना आपत्कालीन मदत देऊन मोलाचे कार्य केले.

या संदर्भात समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “गेल्या १० वर्षाचा इतिहास पाहता जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस पहिल्यांदाच पावसाने असे रौद्र रूप धारण केलेले आहे. त्यामुळे गरज पडल्यावरच नागरिकांनी घर सोडावे अन्यथा बाहेर पडू नये. येत्या दोन दिवसात अतिवृष्टीची शक्यता आहे. समितीचे ४० स्वयंसेवक आपत्कालीन मदतीसाठी तयार आहेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.