Pimpri: वायसीएमएच रुग्णालयातील महिलांच्या अडचणी सोडविणार – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयामधील महिला कर्मचारी आपल्या घरची जबाबदारी सांभाळून शहरातील रुग्णाची अहोरात्र सेवा करतात. गोरगरिब रुग्णांची काळजी घेतात. महिला कर्मचारी आपली जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. प्रत्येकाला योग्य ती सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. महिला कर्मचारी शहराच्या ख-या अर्थाने आदर्श महिला आहेत, असे गौरोद्वगार महापौर राहुल जाधव यांनी काढले. तसेच महिला कर्मचा-यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. सर्व अडचणी सोडविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

महापौर राहुल जाधव यांनी आज (शुक्रवारी) महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील महिला कर्मचा-यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. वायसीएमएचचे अधिष्ठता डॉ. पद्माकर पंडित, डॉ. मनोज देशमुख, नगरसेविका सुजाता पालांडे उपस्थित होते.

  • पिंपरी-चिंचवड महापालिके तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे महिलांसाठी विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महापौर राहूल जाधव, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी चारुशीला जोशी, रोहिणी गव्हाणकर, सीमा सुकाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी अकरा वाजता बोन डेनसिटी आणि महिलांचे आजार याबाबत डॉ. सलोनी पटवर्धन यांनी माहिती दिली. दुपारी बारा वाजता क्रस्त्रा डायग्नोस्टिक्स प्रा. लि. च्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. पल्लवी जैन भटेवरा यांचे थायरॉईड संदर्भात व्याख्यान झाले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता महिला लैंगिक अत्याचारविरोधी कायदयाविषयी ओपॉश सोशो कमर्शियल प्रा.लि. यांनी सविस्तर माहिती दिली.

  • दुपारी अडीच वाजता महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम झाला. तर, दुपारी 3 वाजता प्राणिक हिलींग सेंटरचे शिवम वर्मा यांनी ध्यान साधनाबाबत महिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. सूत्रसंचालन चारुशीला जोशी यांनी केले. तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.