Pimpri: शिवसेनेच्या महिला संघटकपदी उर्मिला काळभोर तर जिल्हा संघटकपदी शादान चौधरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या महिला संघटकपदी अॅड. उर्मिला काळभोर तर मावळ जिल्हा संघटकपदी शादान चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पिंपरी- चिंचवड शहर शिवसेनेच्या महिला संघटकपदी अॅड. उर्मिला काळभोर यांची नियुक्ती करण्यात आली. तर, पिंपरी विधानसभा संघटकपदी सरिता साने आणि चिंचवड विधानसभा संघटकपदी अनिता तुतारे यांची निवड करण्यात आली आहे. काळभोर या मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या समर्थक आहेत. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी शिवसेनेकडून काळभोरनगर प्रभागातून पालिकेची निवडणूक लढविली होती. परंतु, थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला.

याशिवाय जिल्हा संघटकपदी शादान चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मावळ, पिंपरी आणि चिंचवडची जबाबदारी असणार आहे. चौधरी या लोणावळा नगरपरिषदेत विरोधी पक्षनेत्या आहेत. खासदार बारणे यांच्या त्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या शहर प्रमुखपदी योगेश बाबर, जिल्हा प्रमुखपदी गजानन चिंचवडे या आपल्या समर्थकांची वर्णी लावल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी आता महिला आघाडीच्या शहर आणि जिल्हा संघटकपदी आपल्या समर्थकांची वर्णी लावून घेतली आहे. बारणे यांनी मावळचा गड राखण्याची जोरदार तयारी सुरू केली असून पक्ष संघटना मजबूत करण्यावर जोर दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.