Pimpri: शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव म्हणतात, पिंपरी शहरात कोरोनाची साथ आटोक्यात पण…

'हॉटस्पॉट' पुण्यातील रुग्ण पिंपरीतील रूग्णालयात आणणे अयोग्य

एमपीसी न्यूज – सध्या कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरू असले तरी पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची साथ आटोक्यात आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत पिंपरीत कोरोनाची साथ आटोक्यात आहे. मात्र, असे असले तरी सध्या हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना पिंपरी महापालिका रूग्णालयात आणणे योग्य नाही, अशी सूचना शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केली.

शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची आज (मंगळवारी) भेट घेतली. महापालिकेच्या वॉर रूमला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे उपस्थित होते. शिवसेनेतर्फे महापालिका कर्मचा-यांसाठी सॅनिटायझर आणि मास्क कीटही आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर आढळराव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आढळराव म्हणाले, सध्या कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरू असले तरी पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची साथ आटोक्यात आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत पिंपरीत कोरोनाची साथ आटोक्यात आहे. कोरोनाच्या उपाययोजनांबाबत महापालिका प्रशासनाचे काम समाधानकारक आहे.

कोरोनाचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही पिंपरीत चांगले आहे. पुणे शहरात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. त्यामुळे हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना पिंपरी महापालिका रूग्णालयात आणणे योग्य नाही.

कोरोनाबाबत लोकांना अद्याप गांभीर्य नाही. ग्रामीण भागातही हीच परिस्थिती आहे. बाहेरून येणा-या लोकांनी स्वत:हून क्वॉरंटाईन होण्याची गरज आहे. गावपातळीवर याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील शाळा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

ग्रामीण भागात हॉटेल, ढाबा सुरू करण्यास परवानगी देणे चुकीचे आहे. गेल्या चार – पाच दिवसात नागरिक सर्रास वाहने घेऊन फिरत आहेत, असेही आढळराव म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.