Pimpri: महासंघाच्या झिंझुर्डे यांच्या संचालकपदाबाबत चौकशी अहवाल सादर करा

जिल्हा उपनिबंधकांचे निर्देश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंझुर्डे यांचे महापालिका सेवक पतसंस्थेतील संचालकपद तसेच त्यांच्या संस्थेतील कारभाराबाबत सखोल चौकशी करावी. त्याचा अहवाल पंधरा दिवसात सादर करावा, असे निर्देश सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी सहकारी संस्था उपनिबंधकांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे हे पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेतही स्वीकृत संचालक म्हणून कार्यरत आहेत. या संस्थेतील त्यांचे संचालकपद रद्द करावे. संस्थेचे कामकाज, संस्थेतील दोन नैमितिक पदे त्वरीत भरावीत. याबाबत गणेश भोसले, तसेच पतसंस्थेचे संचालक अंबर किसनराव चिंचवडे आणि सोपान मधुकर रणपिसे यांनी अर्जाद्वारे सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाकडे मागणी केली होती.

गणेश भोसले यांच्या अर्जाबाबत खुलासा सादर करण्याच्या सूचना पतसंस्थेला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार संस्थेने 10 जानेवारी 2019 रोजीच्या पत्राद्वारे खुलासा सादर केला आहे. मात्र, संस्थेचे कामकाज आणि बबन झिंझुर्डे यांच्या बाबत संचालक चिंचवडे आणि रणपिसे यांनी गंभीर तक्रार केली आहे. हे तक्रार अर्ज चौकशीसाठी सहकारी संस्था, पुणेचे उपनिबंधक यांच्याकडे पाठवून त्याबाबत सखोल चौकशी करून त्याचा अहवाल पंधरा दिवसात सादर करावी, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.