Pune : शासकीय जमिनींचे बेकायदा हस्तांतरण करणाऱ्या महिला तहसीलदाराला अटक

एमपीसी न्यूज- बनावट शासकीय आदेश तयार करुन ६० एकरांहुन अधिक शासकीय जमिनींचे बेकायदा हस्तांतरण प्रकरणी दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये शिरुरमधील तत्कालीन नायब तहसीलदार आणि अन्न धान्य वितरण कार्यालयातील अधिकारी गीतांजली गरड यांना अटक करण्यात आली.

गरड यांनी बनावट शासकीय आदेश तयार करुन फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना बुधवारी सायंकाळी समर्थ पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणी यापूर्वी चंद्रशेखर ढवळे, बळीराम कड, रमेश वाल्मिकी, सचिन काळेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी वाल्मिकी आणि काळेल यांना अटक देखील करण्यात आली. मात्र, चंद्रशेखर ढवळे आणि बळीराम कड हे फरार आहेत.

याबाबतची माहिती अशी की, जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातील लिपिक चंद्रशेखर ढवळे याने बनावट आदेश तयार केले होते. हे आदेश बनावट असताना सुभाष कारभारी नळकांडे (रा. बुरूंजवाडी, ता. शिरुर) याने गैरवापर केला. या आदेशावरुन प्रकल्पगस्त शेतकऱ्यांच्या नावे शिरुर तहसील कार्यालयातील तत्कालीन लिपीक रमेश वाल्मिकी याने बनावट अर्ज तयार केला. या कारवाईबाबतचे अधिकार नसताना तत्कालीन नायब तहसीलदार गरड यांचे शेरे घेण्यात आले. त्या आधारे शासकीय जमिनीचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे गावकामगार तलाठी मौजे कासारी सचिन काळेल याने फेरफार नोंदी घेतल्या.

या नोंदी तत्कालीन मंडल अधिकारी बळीराम खंडुजी कड यांनी खातरजमा न करता प्रमाणित केल्या. या प्रकरणातील अर्ज बनावट असताना देखील हेतूत: दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयाकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करुन तपास करण्यात आला. ज्या जमिनींची विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या जमिनींची बनावट आदेशाद्वारे सामान्यांना विक्री करण्यात आली. त्यामुळे सामान्य नागरिक आणि शासनची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले होते.

सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुरेश बेंद्रे, उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांनी या प्रकरणाचा तपास केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.