Akurdi : अखिल भारतीय शिंपी समाजातर्फे शनिवारी अखिल शिंपी बहुभाषिक परिषद

एमपीसी न्यूज- श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज पिंपरी- चिंचवड शहर यांच्यावतीने वसंतपंचमी सोहळा आणि अखिल शिंपी बहुभाषिक परिषदेचे आयोजन  करण्यात आले आहे. शनिवार दि. 9 आणि रविवार दि. 10 फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम आकुर्डी खंडोबा माळ येथील संत नामदेव महाराज नगरी,खंडोबा सांस्कृतिक भवन, येथे होणार आहे. अशी माहिती श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज पिंपरी चिंचवड विभाग पुणेचे कार्याध्यक्ष संजय अंबादास संदानशिव यांनी दिली.

शिंपी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारकडे शिवणोद्योग महामंडळासाठी, ओ बी सी महामंडळावर प्रतिनिधित्व मिळण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेमध्ये अहिर, छिपा, मेरू, वैष्णव, नामदेव, रंगारी, भावसार, रोहिला आदि पोटजातींच्या अध्यक्ष, पदाधिकारी व समाज बांधवांचा सहभाग असणार आहे.

या परिषदेचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष सुनील बापु निकुंभ ह्यांच्या अध्यक्षतेखाली, माजी अध्यक्ष व विश्वस्त विजयनाना बिरारी यांच्या प्रेरणेने व पुणे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ भांडारकर व अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था संलग्न श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज पिंपरी चिंचवड मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

या परिषदेमध्ये संपूर्ण भारतातील विविध शिंपी पोटजातीचे एकत्रिकरण करावे, केंद्र सरकारकडे विविध प्रश्नांसाठी मागणी करणे, शिंपी समाजाच्या महामंडळाची स्थापना व्हावी तसेच श्री संत नामदेव महाराजांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार सुरू करावा अशा मागण्या करण्यात येणार आहेत.

सदर कार्यक्रमास संत श्री नामदेव महाराजाचे 16 वे वंशज ह.भ. प. श्री. कृष्णदासबुवा नामदेवबुवा नामदास, साईबाबा संस्थान शिरगांवचे मुख्य विश्वस्त माजी आमदार प्रकाश देवळे, प्रख्यात अभिनेते गोविंद नामदेव, घेवरचंदजी टांडी (चैन्नई), श्री. बुटासिंगजी धरोटीया (राष्ट्रीय महामंत्री अ. भा. छिपा महासभा दिल्ली ), गुणवंतराव वाकरे, सुधीर पिसे, माधवराव हुरपुडे, रामणिक भाई मकवना, राजेश वाडपल्लीवर, ईश्वर धिरडे आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.

सर्व पोटजातीतील समाज बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.